💥परभणीचे शिवसेना आ.राहुल पाटील यांनी शासनाकडे केली १५ हजार क्विंटल बियाणांची मागणी...!


💥जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तात्काळ बियाण्यांची मागणी नोंदवल्यास याचा शासनावरही अचानक बोजा पडणार नाही💥

परभणी (दि.१० मे २०२१) - परभणी जिल्ह्याला गतवर्षी वर्षी ९ हजार क्विंटल सोयाबीनच्या बियाणांची पूर्तता होऊन देखील मोठ्या प्रमाणात बियाणे कमी पडले. त्यामुळे आम्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितास्तव यंदा शासनाकडे 'महाबीज'च्या माध्यमातून १५ हजार क्‍विंटल सोयाबीनच्या बियाण्यांची मागणी नोंदवली असल्याची माहिती परभणी विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार डॉ.राहुल पाटील यांनी दिली.


दरम्यान, परभणी जिल्ह्यात गतवर्षी सोयाबीनच्या बियाण्यांची उगवण न झाल्याने अनेक शेतकऱ्यांपुढे संकट निर्माण झाले होते. त्यावेळी अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे या वर्षी आमदार डॉ.राहुल पाटील यांनी यासंदर्भात पूर्वतयारी केल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर आज सोमवार दि.१० मे २०२१ रोजी येथील महाबीजच्या मुख्य कार्यालयाला भेट देऊन त्या ठिकाणच्या विभागीय आणि जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या बैठकीत त्यांनी बियाण्यांच्या पुरवठा संदर्भातील आढावा घेतला. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार डॉ.पाटील म्हणाले, 'या वर्षी सोयाबीनचा पेरा वाढणार आहे. तर कपाशीचा पेरा जास्त होणार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्व भार सोयाबीन वर येणार असल्याची परिस्थिती आहे. परिणामी, सोयाबीनची मागणी वाढणार आहे. ६१२ असेल किंवा ७१ असेल हे बी-बियाणे सर्वसामान्य शेतकऱ्यांना उपलब्ध झाले पाहिजे. त्यामुळे महाबीजचे अध्यक्ष असतील, विभागीय अधिकारी असतील किंवा जिल्हास्तरीय अधिकारी असतील, यांच्याशी चर्चा केल्यानंतर भविष्यात सोयाबीनच्या बियाण्यांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, असे समजले. त्यामुळे जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त म्हणजे १५ हजार क्विंटल सोयाबीन बियाणांची मागणी आम्ही महाबीजकडे केली आहे.

   तसेच शेतकऱ्यांनी देखील भविष्याचे विश्लेषण आत्ताच केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्ताच बियाण्यांची मागणी नोंदवल्यास याचा शासनावरही अचानक बोजा पडणार नाही, आणि शेतकऱ्यांच्या रोषाला देखील सामोरे जावे लागणार नसल्याचे सुद्धा आमदार डॉ.राहुल पाटील म्हणाले.

     यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर, तालुका प्रमुख नंदू अवचार, जिल्हा परिषद सदस्य दिनेश बोबडे, उपशहर प्रमुख संभानाथ काळे, नगरसेवक सुशिल कांबळे,बाबुभाई फुलपगार, विक्की सोनेकर, अशोक गव्हाणे, प्रकाश डहाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते....

     -

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या