💥महाराष्ट्र राज्यातील मुस्लिम बांधवांनी ईद निमित्त धार्मिक कार्यक्रम घरातूनच साजरे करण्याचे गृह विभागाचे आवाहन...!


💥गृह विभागाचे उपसचिव संजय खेडेकर यांनी या मार्गदर्शक परिपत्रक जारी केले आहे💥

परभणी (दि.११ मे २०२१) - राज्यातील कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने 'ब्रेक द चेन' या मोहिमेतून कडक निर्बंध लागू केले असून मुस्लिम बांधवांनी या आदेशांचे काटेकोरपणे पालन करीत पवित्र रमजान ईद निमित्त नियिमत नमाज पठण,तरावीह तसेच ईफ्तारसाठी मशीदींमधून अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपआपल्या घरातूनच साजरे करावे असे आवाहन राज्याच्या गृह विभागाने केले आहे.

रमजान ईद - २०२१ च्या मार्गदर्शक सूचनांसंदर्भात गृह विभागाने आज मंगळवार दि.११ मे २०२१ रोजी एक परिपत्रक काढले असून त्या परिपत्रकाद्वारे यावर्षी १३ एप्रिल २०२१ पासून मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याचा प्रारंभ झाला. १३ किंवा १४ मे रोजी (चंद्र दर्शनावर अवलंबून) रमजान ईद (ईल उल फित्र) साजरी केली जाणार आहे. सध्या कोविड-१९ च्या दुसर्‍या लाटेमुळे उद्भवलेली अतिसंसर्गजन्य परिस्थिती व वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा विचार करीत राज्य सरकारने १३ एप्रिल २०२१ च्या आदेशामधील मुद्दा क्रमांक १, २, ७ व १० मध्ये नमूद तरतूदींच्या अधीन राहून विशेष खबरदारी घेवून रमजान ईद साजरी करणे आवश्यक ठरले आहे. विशेषतः मुस्लिम बांधवांनी मशीदी किंवा सार्वजनिक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांकरिता एकत्र येवू नये, नमाज पठणाकरीता मशीदीत किंवा मोकळ्या जागेत एकत्र येवू नये, बाजारांमधून खरेदी करतांना गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये, राज्यात रात्रीची संचारबंदी असल्यामुळे संचारबंदीच्या काळात फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल्स लावू नयेत, नागरीकांनी रस्त्यावर विनाकारण फिरु नये, रमजान ईदच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे मिरणूका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक अथवा राजकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येवू नये. धार्मिक स्थळे बंद असल्यामुळे मुस्लिम समाजातील धर्मगुरु, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते व स्वयंसेवी संस्थांनी पवित्र रमजान ईद साधेपणाने साजरी करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करावी, अशी अपेक्षा गृह विभागाचे उपसचिव संजय खेडेकर यांनी या मार्गदर्शक परिपत्रकातून व्यक्त केली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या