💥नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा मतदार संघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनाने निधन...!


💥त्यांचा कोरोना विषाणूंच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला होता💥

नांदेड :  मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते, देगलूर- बिलोली मतदार संघाचे आमदार  रावसाहेब जयवंत अंतापूरकर यांचे आज 9 एप्रिल 2021 रोजी रात्री 11.20 मिनिटांनी कोरोनाने निधन झाल्याचे अधिकृत वृत्त त्यांच्यावर उपचार करणार्‍या बॉम्बे हॉस्पिटलने दिले आहे. ते 65 वर्षांचे होते.  त्यांचा कोरोना विषाणूंच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला होता. त्यांच्यावर मुंबईतील खाजगी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाचे वृत्त सायंकाळी 5 च्या सुमारास व्हायरल झाले होते, परंतु यास हॉस्पिटल प्रशासनाने अधिकृत दुजोरा दिलेला नव्हता. त्यांच्यावर अति गंभीर रुग्ण म्हणून सर्व शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, अशी प्रतिक्रिया हॉस्पिटल प्रशासनाने सायंकाळी दिलेली होती. मात्र अखेरीस रात्री 11.20  मिनिटांनी हॉस्पिटल प्रशासनाने त्यांचे निधन झाल्याचे जाहीर केले. आमदार  रावसाहेब जयवंत अंतापूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली….

त्यांना 22 दिवसापूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आ.अंतापूरकर हे 22 दिवसांपूर्वी कोरोनाबधित झाले होते.तेव्हा स्वतः त्यांनी जनतेला काळजी घेण्याचे आवाहन केले होते.नांदेड येथील भगवती रुग्णालयात 3 दिवस उपचार घेतल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पुढील उपचारासाठी त्यांना मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटल येथे ऍडमिट केले.मागील 8 दिवसापासून ते अत्यवस्थ होते.अगदी शेती- बांध्यावर, वाडी-तांड्यावर जाऊन त्यांनी लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करत होते.अशातच त्यांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाल्यामुळे एक हळव्या मनाचा आमदार आपल्यापासून हिरावला गेल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. 

सन 2009 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवित अंतापूरकर यांनी देगलूर मतदारसंघात विजय मिळविला होता. त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदविका प्राप्त केली आहे. काँग्रेसचे आमदार अमर राजूरकर यांनी मध्यरात्री उशिरा अंतापूरकर यांच्या निधनाच्या बातमीस दुजोरा दिला.   22 दिवसांपूर्वी आ. अंतापूरकर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर नांदेड येथेच उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आलेले होते. मात्र त्यांना न्युमोनिया झाल्याने त्यांच्या दोन्ही किडन्या काम करीत नव्हत्या. परिणामी त्यांची प्रकृती अत्यवस्थ होत गेली. अखेरीस त्यांची मध्यरात्री प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाबद्दल नांदेड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

आ. अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया :
रावसाहेब अंतापूरकर हे राज्याचे कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. अंतापूरकर यांच्या निधनानंतर चव्हाण यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती देताना आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. माझे निकटचे सहकारी व देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे मुंबई हॉस्पिटल येथे थोड्या वेळापूर्वी निधन झाले आहे. रावसाहेब अंतापूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या कुटुंबीयांना हे अपरिमित दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, ही प्रार्थना, असे ट्विट चव्हाण यांनी मध्यरात्री केले आहे.

आ. धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया

विधिमंडळातील आमचे सहकारी, देगलूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. सामान्य माणसाचा नेता म्हणून त्यांची लोकप्रियता होती. स्व. रावसाहेब अंतापूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मी अंतापूरकर परिवाराच्या दुःखात सहभागी आहे.

आ. नाना पटोले (काँग्रेस प्रदेशाध्यक्ष) यांची प्रतिक्रिया :

देगलूर – बिलोली विधानसभेचे आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचे बॉम्बे हॉस्पिटल, मुंबई येथे थोड्या वेळापूर्वी निधन झाले एक मनमिळाऊ व्यक्ती , निरस्वार्थ जनतेची अहोरात्र सेवा करणारा नेता काँग्रेस पक्षा ने गमावला अश्या नेत्या ला भावपूर्ण आदरांजली.

आ. बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया :

देगलूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सतत कार्यरत असणारा सहकारी गमावला. रावसाहेब अंतापूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या कठिण प्रसंगी आम्ही सर्व अंतापूरकर कुटुंबियांसोबत आहोत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या