💥राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी सचिन वाझेंना महिन्याला १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिलं...!


💥मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचा खळबळजनक आरोप💥             

✍️ मोहन चौकेकर 

मुंबई :  सचिन वाझे प्रकरणी बदली करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आता आपली नाराजी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून कळवली असून त्यामध्ये त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. यामध्ये “गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट दिलं होतं”, असा गंभीर आरोप केल्यामुळे या प्रकरणावरून आता राज्यातलं वातावरण तापलं आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून “कायदेशीर कारवाईपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी परमबीर सिंग यांनी हा आरोप केला”, असं ट्वीट अनिल देशमुख यांनी केलं आहे.

परमबीर सिंग यांनी लिहिलेलं तीन पानांचं पत्र समोर आलं असून त्यामध्ये अनेक मुद्दे परमबीर सिंग यांनी मांडले आहे. “गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये सचिन वाझे यांना अनेकदा त्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ज्ञानेश्वर बंगल्यावर बोलावलं होतं. यावेळी त्यांनी सचिन वाझे यांना फंड जमा करण्यासाठी मदत करण्याचे आदेश दिले होते. साधारणपणे फेब्रुवारीमध्ये आणि त्यानंतर सचिन वाझेंना गृहमंत्र्यांनी त्यांच्या घरी बोलावलं होतं. त्यावेळी गृहमंत्र्यांचे पर्सनल सेक्रेटरी पाळंदे आणि इतर काही कर्मचारी देखील तिथे उपस्थित होते. गृहमंत्र्यांनी वाझेंना सांगितलं की त्यांना महिन्याला १०० कोटी रुपये जमा करण्याचं टार्गेट होतं. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी मुंबईत साधारणपणे १७५० बार, रेस्टॉरंट आणि इतर आस्थापनं आहेत. जर त्या प्रत्येकाकडून २ ते ३ लाख रुपये जमा झाले, तर महिन्याला ४० ते ५० कोटी जमा होतील. उरलेले पैसे इतर मार्गांनी जमा करता येतील, असं गृहमंत्र्यांनी वाझेंना सांगितलं होतं”, असा गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे.

सचिन वाझेंनी त्याच दिवशी माझ्या कार्यालयात येऊन या सगळ्या प्रकाराबद्दल मला माहिती दिली. ते ऐकून मला धक्काच बला. या प्रकारावर काय करावं, यावर मी विचार करायला लागलो, असं परमबीर सिंग यांनी पुढे म्हटलं आहे या प्रकारानंतर काही दिवसांनंतर सोशल सर्व्हिस ब्रँचचे एसीपी संजय पाटील यांना देखील गृहमंत्र्यांनी चर्चेसाठी घरी बोलावलं होतं. मुंबईतल्या हुक्का पार्लरविषयी चर्चा होती. या बैठकीला श्री पाळंदे आणि इतर अधिकारी होते. दोन दिवसांनी पुन्हा पाटील यांनी डीसीपी भुजबळ यांच्यासोबत गृहमंत्र्यांच्या बंगल्यावर बोलावलं गेलं. हे दोघे गृहमंत्र्यांच्या केबिनबाहेर वाट पहात असताना श्री. पाळंदे आत गेले आणि बाहेर आल्यानंतर त्यांनी पाटील आणि भुजबळ यांना बाजूला नेऊन माहिती दिली. मुंबईतल्या १७५० बार, रेस्टॉरंट आणि इतर आस्थापनांमधून महिन्याला ४० ते ५० कोटींच्या वसुलीचं टार्गेट गृहमंत्र्यांनी ठेवल्याचं पाळंदे यांनी दोघांना सांगितलं. मला गृहमंत्र्यांनी केलेल्या मागणीविषयी एसीपी पाटील यांनी सांगितलं. १६ मार्चला पाटील यांना मी मेसेजवर विचारल्यानंतर त्यांनी ४ मार्चला या सगळ्या घडामोडी घडल्याचं मला सांगितलं”, असं देखील या पत्रातून पुढे परमबीर सिंग यांनी सांगितलं आहे. तसेच, एसीपी पाटील यांच्यासोबत झालेल्या मेसेजेसची प्रत देखील त्यांनी पत्रासोबत जोडली आहे....        

 ✍️  मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या