💥परभणी जिल्ह्यात पालकमंत्र्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आर्थिक बळकटी तर शिवसेनेचे जाणीवपूर्वक खच्चीकरण...!


💥पूर्णा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा एकलारे यांचा निवेदनाव्दारे पालकमंत्री नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप💥

परभणी (दि.११ मार्च) - परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलीक यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षास आर्थिक बळकटी देत विशेष मेहेर नजर टाकल्याचे तर शिवसेनेचाच बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यात शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचा प्रकार सुरू केल्याचा गंभीर आरोप पूर्णेच्या नगराध्यक्षा श्रीमती गंगाबाई सीताराम एकलारे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे केला आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने मलीक यांनी पूर्णा नगर परिषदेस सुध्दा समप्रमाणात जिल्हा वार्षिक योजनेतून निधीचे वितरण करणे अपेक्षित होते परंतु पूर्णा नगर पालिकेवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. हे ओळखून पालकमंत्री मलिक यांनी अत्यंत कमी निधीवर पूर्णेकरांची बोळवण केली. जिल्ह्यातील वार्षिक योजनेत नगरोत्थान, दलीत वस्ती सुधार योजना व दलित्तेतर योजनेअंतर्गत कामांना ४६ कोटी १५ लाख रुपयांच्या निधीस मंजुरी दिली. त्यात पालकमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या जिंतूर पालिकेस ११ कोटी ६० लाख,पाथरी नगर पालिकेस १० कोटी ६० लाख त्या तुलनेत शिवसेनेच्या ताब्यातील पूर्णा पालिकेस ३ कोटी ६० लाख रुपयांचाच निधी दिला. विशेष म्हणजे या जिल्ह्यात भाजप व भाजपचे समर्थन असणार्‍या नगर पालिकांना प्रत्येकी सात ते आठ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे, असेही नगराध्यक्षा एकलारे यांनी नमूद केले. महाविकास आघाडीत शिवसेना हा प्रमुख पक्ष आहे. पक्षाचे मुख्यमंत्री आहेत. असे असताना पालकमंत्र्यांनी हेतुतः केलेल्या या कृतीविरोधात आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे दाद मागणार आहोत. वार्षिक योजनेतील निधी मंजुरीस स्थगिती द्यावी,नव्याने सुधारित समन्यायी पध्दतीने निधीचे वाटप करावे,अशी अपेक्षाही एकलारे यांनी या प्रसिध्दी पत्रकातून व्यक्त केली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या