💥कोविड लसीकरण मोहिमेला लोकचळवळीत रुपांतरीत करु - मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे


 💥जेष्ठांच्या  लसीकरणासाठी गावागावात युवकांचे सहकार्य घेवू💥

 प्रदिप कोकडवार✍️ 

परभणी (दि.30 मार्च) :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क, सुरक्षीत अंतर व सतत हात साबणाने स्वच्छ करणे या त्रिसूत्रीच्या पालनासह कोविडचे लसीकरण मोठ्या प्रमाणात आवश्यक आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे ग्रामीण भागात लसीकरण वाढावे यासाठी या मोहिमेला लोकचळवळीत रुपांतरीत करु असे प्रतिपादन परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केले आहे.

आज टाकळी कुंभकर्ण गावातील आरोग्य उपकेंद्रात त्यांच्या हस्ते या विशेष मोहिमेचे रुपांतर लोकचळवळीत व्हावे यासाठी आयोजित केलेल्या लसीकरण  कॅम्पला भेट दिल्यावर ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेश देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, शिक्षणाधिकारी डॉ सुचिता पाटेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी शंकरराव देशमुख, गटविकास अधिकारी अनुप पाटील, तालुका आरोग्य अधिकारी रावजी सोनवणे, सरपंच प्रभुलाल जैस्वाल, माजी उपसभापती ज्ञानदेव दंडवते, माजी जिल्हा परिषद सदस्य टी. एम. सामाले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सदाशिव देशमुख, ग्रामविकास अधिकारी पंजाब देशमुख यांची उपस्थिती होती.

कोरोनाच्या प्रादुर्भावापासून जेष्ठ मंडळींचे सरंक्षण व्हावे म्हणून त्यांचे लसीकरण करून घेण्यासाठी युवकांनी पुढाकार घेणे महत्वाचे आहे. 1 एप्रिल 2021 पासून 45 वर्ष वयोगटावरील नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले.  जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या व आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आवर्जून लस घ्यावी, असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले.जेष्ठ मंडळी व गावातील नागरिकांशी संवाद साधताना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. टाकसाळे म्हणाले की, आपल्या वडिलधाऱ्या माणसांची सेवा करणे आपले प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्यमान कसे उंचावता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे  असून गावातील जेष्ठ मंडळींचे शंभर टक्के लसीकरण करून घेण्यासाठी युवकांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे. असे सांगून त्यांनी तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांशी देखील संवाद साधला. यावेळी स्वच्छ भारत मिशन कार्यालयाचे ज्ञानेश्वर गायकवाड, परमेश्वर हलगे, आरोग्य विभागाचे श्री. सोमवंशी  आदींची यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.....

                                                            

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या