💥औरंगाबाद शहरात लॉकडाउन; वेरुळ,अजिंठ्यासह पर्यटनस्थळे पुन्हा बंद....!


💥 जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी संयुक्तपणे दिले आदेश💥

औरंगाबाद (दि.११ मार्च) - जिल्ह्यातील वेरुळ, अजिंठ्यासह अन्य पर्यटनस्थळे ४ एप्रिलपर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी संयुक्तपणे दिले आहेत. तसेच अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी २० पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊ नये असे नव्याने घातलेल्या निर्बंधात म्हटले आहे. औरंगाबाद शहरात गुरुवारपासून अशंत: टाळेबंदी लागू करण्यात आली असून सायंकाळी ९ वाजेपासून सर्व दुकाने बंद करण्याचे निर्देश तीन दिवसापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्या आदेशात दुरुस्ती करुन पर्यटनस्थळे, किल्ले, स्मारके, संग्रहालये बंद करण्याच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. दुकाने सुरू ठेवण्यासाठी चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील आरटी-पीसीआर चाचणी संचाची परिस्थिती लक्षात घेता प्रतिजन चाचण्या करण्यासही मुभा देण्यात आली असून तातडीने प्रतिजन चाचणी आणि त्यानंतर १५ दिवसांत आरटीपीसीआर चाचणी करुन घेण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. दुकानांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाची चाचणी करुन घेणे आवश्यक आहे. प्रतिजन चाचणी तातडीने करुन न घेतल्यास टाळेबंदीच्या कालावधीमध्ये दुकाने पूर्णत: सील केले जातील. केवळ रॅपिड अ‍ॅन्टीजेन चाचणीने भागणार नाही तर या चाचणीनंतर आरटीपीआर चाचणी करुन घेणे आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण लोकसत्ताशी बोलताना म्हणाले.

यापूर्वीच शहरातील विवाहसमारंभ, सभा, आंदोलने, शाळा, महाविद्याालये, विद्यापीठातील अध्ययन-अध्यापन बंद करण्यात आले आहे. शहरातील जाधवमंडी येथे होणारी गर्दी लक्षात घेता खते आणि किटकनाशकांचे दुकाने वगळता बाकी भाजीमंडई पूर्णत: बंद करण्याची निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. टाळेबंदीतील निर्बंधाचे उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल केले जातील असेही जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या