💥हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातील दोन पुलांच्या कामांना मान्यता सुमारे ६.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर...!


💥आमदार संतोष बांगर यांच्या पाठपुराव्याला यश💥

हिंगोली (दि.१६ मार्च) - जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातील सांडस ते सालेगाव  व बेलमंडळ येथील पुलाच्या बांधकामाला शासनाने मान्यता दिली असून त्यासाठी सुमारे ६.५० कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केला आहे. आमदार संतोष बांगर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याने आता या गावकऱ्यांचा वाहतुकीचा प्रश्‍न मिटणार आहे कळमनुरी तालुक्यातील बेलमंडळ येथे गावात जाण्यासाठी पुल नसल्याने गावकऱ्यांना पायपीट करावी लागत होती. या संदर्भात गावकऱ्यांनी प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी केल्या मात्र त्याचा उपयोग झाला नाही. त्यानंतर आमदार संतोष बांगर यांनी बेलमंडळ येथे भेट दिली असता गावकऱ्यांनी पुलाच्या बांधकामाचा समस्या मांडली. गावकऱ्यांची अडचण तातडीने सोडविण्याचे आश्‍वासनही आमदार बांगर यांनी दिले होते.

या शिवाय सांडस ते सालेगाव मार्गावरील पुल मागील वर्षी पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे वाहुन गेला. त्यामुळे या मार्गावरील दहा गावांतील गावकऱ्यांचा वाहतुकीचा प्रश्‍न निर्माण झाला होता. या भागातील गावकऱ्यांनी देखील आमदार बांगर यांना पुलाच्या बांधकामासाठी साकडे घातले होते दरम्यान, सांडस ते सालेगाव व बेलमंडळ या दोन ठिकाणी पुलाच्या बांधकामाच्या मंजुरीसाठी आमदार संतोष बांगर यांनी शासनाकडे पाठपुरावा सुरु केला होता. पुला अभावी गावकऱ्यांची प्रवासासाठी होणारी पायपीट शासन दरबारी मांडली होती. त्यानंतर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये एशीयन डेव्हलपमेंट बँकेच्या टप्पा क्रमांक दोन मध्ये या दोन्ही पुलांच्या कामांना मंजूरी देण्यात आली आहे.

यामध्ये सांडस ते सालेगाव या मार्गावरील ४२ मिटर लांबीच्या पुलाच्या बांधकामासाठी २.७७ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. तर बेलमंडळ येथील ५७ मिटर लांबीच्या पुलाच्या बांधकामासाठी ३.९१ कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचे आदेशही शासनाने काढले आहेत. त्यामुळे आता लवकरच या कामांना सुरवात होणार असून गावकऱ्यांचा वाहतुकीचा प्रश्‍न मिटणार आहे. या पुलाच्या कामासाठी पाठपुरावा केल्या बद्दल गावकऱ्यांनी आमदार संतोष बांगर यांचे आभार व्यक्त केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या