💥उद्योगपती मुकेश अंबानी कुटुंबाला धमकावणाऱ्यांच्या हेतूंबाबत गूढ वाढले....!


💥गुन्हे शाखा ठोस माहितीच्या प्रतीक्षेत असून गुन्हे शाखेने या प्रकरणाच्या तपासासाठी विविध पथके तयार केली💥

 मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाला धमकावणाऱ्यांबाबत मुंबई गुन्हे शाखेच्या हाती अद्याप ठोस माहिती लागलेली नाही.त्यामुळे घराबाहेर स्फोटके असलेली गाडी उभी करून धमकीची चिठ्ठी लिहिण्याच्या प्रकरणामागे खोडसाळपणा आहे की अतिरेकी संघटनेचे हे कृत्य आहे या बाबत गुन्हे शाखा संभ्रमावस्थेत आहे. 


अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटके आणि धमकीची चिठ्ठी चोरीच्या स्कॉर्पिओ कारमध्ये सोडणारी व्यक्ती गुन्हे शाखेच्या हाती लागलेली नाही.स्कॉर्पिओ कार चोरणारी आणि ती अंबानी यांच्या घराजवळ बेवारस अवस्थेत सोडणारी व्यक्ती एकच आहे का ? हे स्पष्ट झालेले नाही.या व्यक्तीस मुंबईबाहेर घेऊन जाणारी इनोव्हा कार आणि तिच्या चालकाची ओळख पटवणारी कोणतीही माहिती गुन्हे शाखेला मिळालेली नाही.कार चोरणाऱ्या ती अंबानींच्या घराजवळ बेवारस सोडणाऱ्या व्यक्ती हाती लागल्या नंतरच या प्रकारामागील हेतू स्पष्ट होऊ शकेल, अशी प्रतिक्रिया गुन्हे शाखेचे सहआयुक्त मिलिंद भारंबे यांनी व्यक्त दिली. 

अतिरेकी संघटना असा प्रकार घडविण्याची शक्यता कमी आहे.मात्र या टप्प्यावर कोणतीही शक्यता फेटाळता येणार नाही.गुन्हे शाखा सर्व दृष्टिकोनातून या प्रकरणाचा तपास करते आहे.राष्ट्रीय तपास यंत्रणेनेही (एन.आय.ए.) याप्रकरणी समांतर तपास सुरू केला आहे, अशी माहिती तपासाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर दिली.गुन्हे शाखेने या प्रकरणाच्या तपासासाठी विविध पथके तयार केली असून त्यातील काही सराईत कार चोरांची, त्यांच्या साथीदारांची झाडाझडती घेत आहेत. 

याशिवाय वाहनाची दुरुस्ती करणाऱ्या गॅरेजमध्येही चौकशी सुरू असल्याचे समजते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या