💥परभणी-गंगाखेड रस्त्यावरील पिंगळगड नाल्यावरील पुलावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्तारोको....!


💥दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठिंबा; जिल्ह्यातील एफआरपी रक्कम न दिलेल्या ऊस कारखान्यांवर कार्यवाही करण्याची मागणी💥

परभणी (दि.६ फेब्रुवारी) - दिल्ली येथील शेतकरी आंदोलनास जाहीर पाठिंब्यासह जिल्ह्यातील एफआरपी रक्कम न दिलेल्या ऊस कारखान्यांवर कार्यवाही करावी, खासगी शाळांकडून पालकांना शुल्काबाबत होत असलेला तगादा थांबवावा, शाळांना २५ टक्केच शुल्क आकारण्याबाबत सूचना द्याव्यात, आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज शनिवार दि.६ फेब्रुवारी २०२१ रोजी परभणी-गंगाखेड रस्त्यावरील पिंगळगड नाल्यावरील पुलावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्या नेतृत्वाखआली करण्यात आलेल्या रास्तारोको आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. जिल्हा प्रशासनास दिलेल्या निवेदनात दिल्ली येथील सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास संघटनेचा जाहीर पाठिंबा आहे. परभणी जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने कायद्याप्रमाणे उसाची एफआरपी एक रकमी दिलेली नसल्याने ऊस कारखान्यांवर तात्काळ कार्यवाही करावी, जिल्ह्यातील खासगी शाळा ऑनलाईन सुरू झाल्या आहेत. त्यांच्याकडून पालकांना संपूर्ण फीस जमा करण्याचा तगादा लावल्या जात आहे. तो तात्काळ बंद करावा. यावर्षी केवळ 25 टक्के फीस आकारण्यात यावी, असेही नमूद करण्यात आले आहे. प्रशासनाने ऊस कारखान्यांच्या कार्यवाहीसह पालकांना होत असलेल्या त्रासाचाही विचार करत संबधितांवर तातडीने कारवाई करावी, असे यावेळी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी म्हटले.

या आंदोलनात भास्कर खटिंग, गजानन तुरे, शेख जाफर, रामकिशन गरूड, मुंजाभाऊ लोंढे, रामदास अब्दागिरे, सतीश दुधाने, विकास भोपळे, विजय शेळके, सय्यद राजू, गजानन दुघाणे, सुभाष गायकवाड, शिवाजी गरूड यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. रास्तारोको दरम्यान दुतर्फा वाहने थांबली होती. यावेळी सहाय्यक पोलिस अधीक्षक अविनाश कुमार, प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप काकडे, कोतवाली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील, व्ही.एस. अरसेवार यांच्यासह पोलिस कर्मचार्‍यांचा मोठा बंदोबस्त तैणात करण्यात आला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या