💥‘व्हॅलेंटाइन्स’च्या दिवशी नोंदणीकृत विवाह यंदा अशक्य,रविवार असल्याने विवाह नोंदणी कार्यालयाला सुट्टी.....!


💥‘व्हॅलेंटाइन्स’ दिनी विवाह बंधनात अडकून तो क्षण अविस्मरणीय करण्यास अनेक जण प्राधान्य देतात💥

(धन्यवाद साभार - पुर्वा साडविलकर),

ठाणे : १४ फेब्रुवारी रोजी अर्थात ‘व्हॅलेंटाइन्स डे’ला लग्नाची गाठ बांधून प्रेमाच्या नात्याला आठवणीचे कोंदण लावण्याचे मनसुबे आखले जातात.या दिवशी लग्नमुहूर्त नसल्यास अनेक जोडपी विवाह नोंदणी कार्यालयात नोंदणी करून तो दिवस अविस्मरणीय करतात.परंतु यंदा ‘व्हॅलेंटाइन्स डे’ला रविवारची सुट्टी असल्याने विवाह नोंदणी कार्यालय बंद राहणार आहे. 

एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करण्याचा महिना म्हणून फेब्रुवारी महिन्याकडे पाहिले जाते.फेब्रुवारी महिन्यातील ७ ते १४ तारीख हा आठवडा प्रेमाचा आठवडा म्हणून साजरा केला जातो.या आठवड्यात विवाह करण्याकडे अनेक जोडप्यांचा कल असतो.त्यातही ‘व्हॅलेंटाइन्स’ दिनी विवाह बंधनात अडकून तो क्षण अविस्मरणीय करण्यास अनेक जण प्राधान्य देतात. त्यासाठी काही जण विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन साध्या पद्धतीने लग्न करतात.तर काही जण सभागृहात थाटामाटात लग्न करतात. परंतु यंदा व्हॅलेंटाइनच्या दिवशी रविवार आल्याने विवाह नोंदणी कार्यालय बंद राहणार आहे. 

त्यामुळे जी जोडपी साध्या पद्धतीने विवाह करण्यास इच्छुक होती त्यांच्यासाठी हा मुहूर्त टळला आहे.विवाह नोंदणीत घट गेल्या वर्षी म्हणजेच ७ ते १४ फेब्रुवारी २०२० या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील एकूण १५९ जोडपी लग्नाच्या बेडीत अडकली होती. तर यंदाच्या वर्षी व्हॅलेंटाइन आठवड्याची सुरुवातही रविवार आणि शेवटही रविवारने होत असल्याने या वर्षी या आठवड्यात नोंदणी पद्धतीने होत असलेल्या विवाहांत घट झाल्याचे दिसून येत आहे.या वर्षी  ८ फेब्रुवारीला २४ जोडपी, ९ फेब्रुवारीला १२ जोडपी आणि १० फेब्रुवारीला २० जोडपी विवाह बंधनात अडकली आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या