💥स्वयंचलित आणि स्वदेशी बनावटीच्या पहिल्या मेट्रोगाडीची डेपोतील चाचणी यशस्वी....!


💥महिनाभरानंतर मार्गिकेवर धावण्याची चाचणी💥

 मुंबई : स्वयंचलित आणि स्वदेशी बनावटीच्या पहिल्या मेट्रोगाडीची चाचणीपूर्व चाचणी चारकोप डेपोमध्ये घेण्यात आली.या यशस्वी चाचणीनंतर पुढील महिनाभरात विविध उपप्रणालींची चाचणी करून मग प्रत्यक्ष मार्गिकेवर पहिल्या मेट्रो गाडीची चाचणी करण्यात येणार आहे. 

स्वयंचलित आणि स्वदेशी बनावटीची पहिली मेट्रो गाडी गेल्या महिन्यात मुंबईत दाखल झाली.त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २९ जानेवारीला चारकोप डेपोमध्ये या गाडीचे अनावरण केले.मेट्रो २ ए (डी.एन. नगर ते दहिसर) आणि मेट्रो ७ (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) या मार्गिका या वर्षी जूनमध्ये सुरू करण्याचे उद्दिष्ट असून, त्यासाठी ९६ मेट्रोगाड्यांची बांधणी बंगळूरु येथील भारत अर्थ मुव्हर्स लि. (बी.ई.एम.एल.) करत आहे. 

अनावरणानंतर बी.ई.एम.एल.च्या अभियंत्यांनी चारकोप येथील डेपोमध्ये सर्व डब्यांची तपासणी केली.तसेच मर्यादित हालचालींसाठी हार्ड-वायर्ड कमांडचा वापर करून सहा डब्यांच्या गाडीचे तीन-तीन डब्यांमध्ये विभाजन केले.त्याच वेळी पेंटोग्राफ कंट्रोल्स, प्रोपल्शन आणि ब्रेक यंत्रणेची चाचणी घेण्यात आली.या तीन-तीन डब्यांची स्वतंत्रपणे चाचणी १६ आणि १७ फेब्रुवारीस डेपोमध्येच घेण्यात आली. 

या चाचण्या झाल्यानंतर चारकोप डेपोमध्ये सर्व सहा डब्यांच्या मेट्रोगाडीची ५२० मीटर अंतराची चाचणी २५ फेब्रुवारीला बुधवारी घेण्यात आली.मुख्य मार्गिके वरील चाचणीपूर्व चाचणी आगारात यशस्वी झाली असून आता विविध उपप्रणालींच्या चाचण्या सुरू केल्या जातील असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या