💥पुर्णा तालुक्यात ५८ ग्रामपंचायतींच्या निवडणूकीत किरकोळ वादविवाद वगळता सर्वच मतदान प्रक्रिया शांततेत...!


 💥उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष राठोड यांच्या नेतृत्वाखालील पोलिस दलाने बजावला चोख बंदोबस्त💥 

 पूर्णा (दि.१५ जानेवारी) तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींच्या निवडणूकीत उभे राहिलेल्या उमेदवारांचे भविष्य आज मतदान पेटीत बंद झाले असले तरी निवडणूक निकालाची प्रतिक्षा अजूनही कायम असून तालुक्यातील ५८ गावांतील तब्बल १८६ मतदान केंद्रावर किरकोळ वादविवादाच्या काही घटना वगळता सर्वत्र अत्यंत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली असल्याचे दिसत असून तालुक्याचे कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष राठोड यांच्या दिशा निर्देशा प्रमाणे पोलिस प्रशासनाने अत्यंत चोख बंदोबस्त ठेवल्याने या मतदान प्रक्रियेला कुठलाही गालबोट लागला नाही.दरम्यान मतदान प्रक्रियेत सर्वत्रच मोठी चुरस पहावयास मिळाली.सायंकाळी ०५-०० वाजेपर्यंत सुमारे ८०% मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निरीक्षक दिपाली मोतीहेळे,उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील,तहसिलदार पल्लवी टेमकर यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार दशरथ कोकाटे ,वंदना मस्के ,उपेंद्र करवंदे ,नामदेव चौधरी,शिवशरण शिराळे ,संतोष मुर्गे यांच्यासह निवडणूक विभागातील कर्मचाऱ्यांनी शिस्तबद्ध नियोजन केले होते.या कामासाठी ९४२ कर्मचारी तैनात करण्यात आले होते .पूर्णा,चुडावा,ताडकळस पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. एका एका मताचे महत्व लक्षात घेवून मतदान खेचण्यासाठी चढाओढ लागली होती.बाहेरगावी राहणाऱ्या मतदाराना आणण्यासाठी अनेक उमेदवारांनी अगोदरच नियोजन केल्याचे दिसून आले. काही ठिकाणी लक्ष्मीअस्त्राचा वापर झाल्याच्या चर्चा ऐकावयास मिळाल्या. तालुक्यातील चुडावा , एरंडेश्वर ,आहेरवाडी , ताडकळस ,कावलगाव या मोठ्या गावातील व जिल्हास्तरावर नेतृत्व करणाऱ्या पुढाऱ्यांच्या गावात त्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे दिसून आले.काही ठिकाणी सरळ लढती आहेत तर काही ठिकाणी तिरंगी चुरस पहावयास मिळाली. आहेरवाडी येथे दोन्ही हात नसलेल्या व युथ आयकॉन असलेल्या योगेश खंदारे यांनी पायाने मतदानाचा हक्क बजावला यावेळी मतदान अधिकारी विजय बगाटे यांनी त्यांच्या पायाच्या बोटाला शाई लावली...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या