💥परभणीतील नियोजित वैद्यकीय महाविद्यालयास गोरक्षणची जमीन योग्य - जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर


💥जमिन तातडीने वैद्यकीय विभागास हस्तांतरीत होणे आवश्यक;त्यादृष्टीने कारवाई व्हावी असे जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे💥

परभणी (दि.२० डिसेंबर)- नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेकरिता परभणी शहरासह ब्रम्हपुरी तर्फे लोहगाव परिसरातील कृषी गो-संवर्धन मर्यादीत (गोरक्षण) या संस्थेचे ५२.०६  हेक्टर आर मधील जमीन योग्य आहे.ती तातडीने वैद्यकीय विभागास हस्तांतरीत होणे आवश्यक आहे असे मत जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी राज्याच्या उद्योग विभागाच्या प्रधान सचिवांना पाठविलेल्या पत्राद्वारे म्हटले आहे. 



शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय स्थापनेकरिता परभणी शहरातील सर्व्हे नंबर ५११,५१३,५१५/१,५१५/२ असे एकूण क्षेत्रफळ १४.८८ हेक्टरा आर व ब्रम्हपुरी तर्फे लोहगाव येथील गट क्रमांक २,२०,४७,५३ अशी एकूण ५२.०६ हेक्टर आर जमीन हस्तांतरीत करण्याबाबत वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या संचालकांनी कळविले आहे. ती जमीन ही सातबारा अधिकार अभिलेखात परभणी कृषी गोसंवर्धन मर्यादीत परभणी या संस्थेच्या नावे आहे. ही संस्था मराठवाडा विकास महामंडळ औरंगाबाद यांची दुय्यम कंपनी आहे. कंपनी कायदा १९५६ अन्वये सन १९७७ मध्ये या कंपन्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे. या कंपनीत सहकारी गौरक्षण संस्था परभणी यांचे रुपये ५ लाखाचे समभाग आहेत. या भाग भांडवला पोटीच संस्थेने परभणी कृषी गो-संंवर्धन मर्यादीत परभणीकडे परभणी जिल्ह्यातील परभणी शहर, ब्रम्हपुरी तर्फे लोहगाव, रायपूर, ब्राम्हणगाव, टाकळी कुंभकर्ण, धर्मापुरी, आर्वी व भोगाव येथील सुमारे ४०० एकर जमीन, परभणी शहरा जवळील गोरक्षण वाडा, एक गोडाऊन वर्ष १९७७ मध्ये असलेले दर विचारात घेवून या स्थावर मालमत्ता रुपये ५ लाख समभागापोटी अंशदान म्हणून परभणी कृषी गो संवर्धन मर्यादीत परभणीकडे हस्तांतरीत केले आहेत. त्याप्रमाणे परभणीत गो संवर्धन म.परभणीचे भाग प्रमाणपत्र दिलेले असून या ठिकाणी असलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर परभणी कृषी गो संवर्धन मर्यादीत परभणीच्या नावाची तेव्हापासून नोंद झालेली आहे. 

संदर्भीय पत्रकान्वये वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेकरिता शहरातील सर्व्हे नंबर ५११,५१३,५१५/१,५१५/२ एकूण क्षेत्रफळ १४.८८ हेक्टर आर व ब्रम्हपुरी तर्फे लोहगाव येथील गटक्रमांक २,२०,४७,५३ एकूण ५२.०६ हेक्टर आर मागणी केलेल्या जमिनी या परभणी शहरापासून जवळ आहेत, असे जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी नमुद केले असून वैद्यकीय महाविद्यालयासाठी त्या जमिनी योग्य व आवश्यक आहेत.याबाबत सदर जमिनी या शासकीय वैद्यकीय महाविद्यालसाठी देण्याबाबत सर्वस्तरावरून मागणी होत आहे, असेही म्हटले. 

सद्यस्थितीत परभणी कृषी गो संवर्धन मर्यादीत परभणी यांच्याकडे कर्मचारी नाहीत. जमिनीवर त्यांचे नियंत्रण नाही. त्या जमिनीवर अतिक्रमणे होण्याची शक्यता आहे. सदरील जमिनी या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी प्रदान केल्यास जमिनीचा चांगल्या कामासाठी वापर होईल, असे जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी म्हटले. मराठवाडा विकास महामंडळ औरंगाबाद यांच्या दुय्यम कंपनीकडील ही जमिन तातडीने वैद्यकीय विभागास हस्तांतरीत होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने कारवाई व्हावी, अशी विनंतीही जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी केली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या