💥परभणी जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे आरटीपीसीआर तपासणीबाबत जनजागृती मोहिम...!


💥कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी नियमांचे पालन करावे, आदी फलके अधिकारी व कर्मचार्‍यांच्या हातात होती💥

परभणी (दि.२३ डिसेंबर) : जिल्ह्यात आरटीपीसीआर तपासणीचे प्रमाण अत्यंत कमी आहे.  जनतेमध्ये जनजागृती व्हावी या  जिल्हा परिषदेचे अधिकारी व आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांच्या वतीने जिल्हा परिषद ते शिवाजी चौकापर्यंत आज बुधवार दि.२३ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी ०५-०० वाजता शहरातून रॅली काढण्यात आली.


जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी जनजागृती संदर्भात आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचार्‍यांची कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेमध्ये आरटीपीसीआर चाचणी वाढवण्याबाबत विचार विनिमय केला. यावेळी महापालिका आयुक्त देविदास पवार, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.बी.एस. नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शंकर देशमुख, अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.डी.खंदारे, डॉ. किशोर सुरवसे यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी परभणी जिल्हा हा आरटीपीसीआर तपासणीत कमी आहे. मात्र, त्या तुलनेत मृत्यूदर जास्त असल्याने नागरिकांना आरटीपीसीआर तपासणी करण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे असल्याचे मत टाकसाळे यांनी  यावेळी व्यक्त केले.  यावेळी जिल्हा शासकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात येणार्‍या प्रत्येक रुग्णाची तसेच सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटूंबियांची आरटीपीसीआर तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही यावेळी श्री.टाकसाळे यांनी केले. या रॅलीस उपस्थित असलेल्या सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांनी हातात जनजागृतीचे फलक घेऊन जिल्हा परिषदेपासून शासकीय रुग्णालय मार्गे शिवाजी चौकापर्यंत फेरी काढण्यात आली. यात नागरिकांनी आरटीपीसीआर चाचणीस घाबरू नये, आपली तपासणी करून घ्यावी, नागरिकांनी मास्क वापरावा, कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी नियमांचे पालन करावे, आदी फलके अधिकारी व कर्मचार्‍यांच्या हातात होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या