💥परभणी जिल्हा रुग्णालयात स्वॅबचा अहवाल अनिर्णित येत असल्यामुळे रुग्णासह नातेवाईकांची वाढतेय चिंता...!



💥जिल्हा रुग्णालयात घेण्यात आलेले अनेक स्वॅब अनिर्णीत अशा शेर्‍याने परत येत आहेत💥

परभणी (दि.०६ सप्टेंबर) ः येथील जिल्हा रुग्णालयातून घेण्यात येत असलेल्या स्वॅबचा अहवाल अनिर्णित येत असल्याने रुग्णासह नातेवाईक व संपर्कातील मित्रपरिवार मात्र, चिंतेत राहू लागल्याचे चित्र दिसून येत आहे.


आरोग्य यंत्रणेने जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरात तयार करण्यात आलेल्या कोविड रुग्णालयात कोरोनावर उपचार करण्यात येत आहेत. कोविड रुग्णालय परिसरात रुग्ण दाखल होताच सर्वप्रथम येणार्‍या रुग्णाची माहिती येथे घेतली जाते. त्यानंतर त्याची तपासणी करून त्यास तीन मजल्यांच्या इमारतीतील पहिल्या मजल्यावर स्वॅब घेण्यासाठी पाठवले जाते. तेथे स्वॅब घेतल्यानंतर दुसर्‍या दिवशी त्याचा अहवाल येत असल्याचे सांगितल्या जाते. परिणामी, तोपर्यंत दाखल करून घेतलेला रुग्ण हा `सस्पेक्टेड`च्या यादीत असतो. स्वॅबचा अहवाल जसा येईल त्यावर रुग्णावर उपचार करण्यात येतात. `पॉझिटिव्ह` असेल तर तेथेच दुसर्‍या वा तिसर्‍या मजल्यावर उपचार सुरू केले जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
जिल्हा रुग्णालयात घेण्यात आलेले अनेक स्वॅब अनिर्णीत अशा शेर्‍याने परत येत असल्याने त्यांचा नेमका अहवाल येथील आरोग्य यंत्रणेलाही सांगता येईनासा झाल्याने काही रुग्णांचे दोन-दोनवेळा स्वॅब प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. रुग्णाचा स्वॅब घेतल्यानंतर रुग्णासह कुटूंबिय व संपर्कातील सारेच जण अक्षरशः चिंतेतच राहू लागल्यासारखे वातावरण दिसून येत आहे. कारण स्वॅबचा अहवाल येत असल्याने ठराविक काळ `वेटिंग`वर रहावेच लागते. मात्र, अनेक रुग्णांचे दोन-दोनदा स्वॅब घेऊनही "ते अनिर्णित आले, पुन्हा द्या", असे म्हणत तिसर्‍यांदा स्वॅब घेतला जात आहे.
दरम्यान, स्वॅब प्रयोगशाळेत पाठवल्यानंतर काही स्वॅब हे अनिर्णित येतात. ज्यात निगेटिव्ह की पॉझिटिव्ह हे नेमके समजू शकत नाही. त्यामुळे पुन्हा स्वॅब घेऊन त्याचा अहवाल मागवल्या जातो. मात्र, शासकीय रुग्णालयात दाखल रूग्णाची तपासणी करून आवश्यक तो उपचार तातडीने सुरू करण्यात येत असल्याची माहिती शासकीय रुग्णालयातील सुत्रांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या