💥परभणी जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधीत रुग्णांचा उपचार करणारे आतापर्यंत तब्बल दिड डझन कोरोनायोद्धे बाधित...!


💥सीएस स्वतः राऊंडवर,फिजिशियनचा वाणवा कायम जिल्हा शासकीय रुग्णालयात कमालीची अस्वस्थता💥

परभणी (दि.१२ सप्टेंबर) कोरोना महामारीला सुरूवात झाल्याच्या मागील पाच-सहा महिन्यांपासून जिल्हा शासकीय रुग्णालयात कर्तव्यावर कार्यरत राहून अहोरात्रपणे कोरोनाबाधित रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरविणार्‍या अर्धाडझन वैद्यकीय तज्ञ डॉक्टरांसह सुमारे एकडझन कर्मचारीच आतापर्यंत कोरोनाबाधित झाल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. परंतू या आपत्कालीन स्थितीत जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांच्यासह अन्य सहकारी कोरोनाविरूध्दचा हा किल्ला लढवित आहेत.

कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. परभणी शहरासह जिल्ह्यात दररोज बाधितांची संख्या प्रचंड वाढू लागली आहे. त्या गोष्टीचा ताण साहजीकच जिल्हा रुग्णालयावर आला आहे. कारण कोरोनाबाधित रुग्णांबरोबर कॉरंटाईन केलेल्या व्यक्तींनासुध्दा वैद्यकीय सुविधांसह अन्य सुविधा पुरविताना रुग्णालयास अक्षरशः नाकेनऊ येऊ लागले आहेत. मुळातच रुग्णालयात मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. विशेषतः आपत्तीच्या या काळात फिजिशियनचीच नित्तांत गरज असताना अवघ्या एक-दोन फिजिशियनवरच दारोमदार अवलंबुन आहे. त्यातच कोविड सेंटर्समधून काम करणारे वैद्यकीय अधिकारी- कर्मचारी एकापाठोपाठ एक बाधित होऊ लागल्याने आरोग्य विभागात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
दुर्दैव म्हणजे रुग्णालयात कोरोनायोद्धा म्हणून भूमिका बजावणार्‍या आरोग्य खात्यातील एका प्रशिक्षणार्थी तरुण डॉक्टरचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे अस्वस्थता असतानाच आता रुग्णालयाअंतर्गत सहा वैद्यकीय अधिकारी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे ते उपचारार्थ आहेत. त्यातील काही योरोनायोद्धे कोविड सेंटर्समध्येच मोठ-मोठ्या जबाबदार्‍या सांभाळणारे आहेत. त्यामुळेच प्रशासन अक्षरशः हतबल झाले आहे. त्यातच रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरविणार्‍या कर्मचार्‍यांनाही कोरोनाची लक्षणे आढळल्याने मोठा पेच उभा राहिला आहे. जवळपास १२ कर्मचारी आतापर्यंत कोरोनाबाधित आढळले असून त्यामुळे काही जण उपचारार्थ दाखल आहेत.
सहा वैद्यकीय अधिकारी व १२ हून अधिक कर्मचारी बाधित आढळले. यंत्रणा काहीशी विस्कळीत होत असल्याचे लक्षात येताच शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे हे स्वतः मैदानात उतरल्याचे चित्र दिसून येत आहे. ओपीडीसह अन्य विभागातील रुग्णाची राऊंड घेत तपासणी डॉ. नागरगोजे यांनी स्वतः केली. स्वतः सीएस राऊंड आल्याने उपस्थित अधिकारी - कर्मचारीही काहीसे विचारमग्न झाले. जिल्हा शल्यचिकित्सकांनी मात्र, वैद्यकीय अधिकार्‍यांची कमतरता भासू दिली नसून कोरोनाच्या या परिस्थितीशी दोन हात करीत त्यास रोखण्याचा प्रयत्न सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी दाखवून देत कर्मचार्‍यांत एक प्रकारे उर्जा निर्माण केली...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या