💥पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात शुक्रवारी एका मिनी बसला रेल्वे धडकल्याने २९ जणांना दुर्दैवी मृत्यू...!💥अपघातात किमान २९ जणांचा मृत्यू,त्यातील बहुतेक पाकिस्तानी शीख होते💥

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात शुक्रवारी एका मिनी बसला रेल्वे धडकल्याने २९ जणांना आपला जीव गमवावा लागला. मृतांमध्ये बहुतांश शीख यात्रेकरू होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कराचीहून लाहोरकडे जाणाऱ्या शाह हुसेन एक्सप्रेस गाडीने दुपारी अडीचच्या सुमारास फर्रुकाबाद येथे मानवरहित क्रॉसिंगवर मिनी बसला धडक दिली. बसमध्ये शीख यात्रेकरू बसले होते. ही घटना लाहोरपासून सुमारे ६० किमी अंतरावर घडली आहे. इवॅक्यु ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डाचे (ईटीपीबी) प्रवक्ते आमिर हाश्मी यांनी सांगितले की, अपघातात किमान २९ जणांचा मृत्यू झाला. त्यातील बहुतेक पाकिस्तानी शीख होते.


हाश्मी म्हणाले, ‘बस शीख यात्रेकरूंना फर्रुकाबादमधील गुरुद्वारा सच्चा सौदा येथे घेऊन जात होती. भाविक पेशावर येथून ननकाना साहिब येथे आले होते. ननकाना साहिब येथे थांबल्यानंतर ते पेशावरला जात होते. ननकाना साहिबच्या सीमेपर्यंत त्यांना ईटीपीबीची सुरक्षा दिली गेली होती.’ रेल्वे मंत्रालयाने एका निवेदनात सांगितले की, बचाव टीम घटनास्थळी पोहोचली आणि जखमींना जिल्हा मुख्यालय रूग्णालयात नेले. विभागीय अभियंत्याला निलंबित करण्यात आले असून याप्रकरणी तपास सुरू केला असल्याचे रेल्वेने म्हटले आहे. रेल्वेमंत्री शेख राशिद यांनी अधिकाऱ्यांना या घटनेसाठी जबाबदार असलेल्यांवर त्वरित पाऊल उचलण्याचे आदेश दिले आहेत.


एका वृत्तसंस्थेनुसार, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील शेखूपुराचे जिल्हा पोलिस अधिकारी गाझी सलाहुद्दीन म्हणाले की, ही घटना शेखूपुराच्या फर्रुकाबादची आहे. कराचीहून लाहोरकडे जाणारी शाह हुसेन एक्सप्रेस प्रवासी गाडी एका व्हॅनला धडकली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या