💥बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करावी - पालकमंत्री अमित देशमुख💥जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोव्हीड-19 बाबतच्या आढावा बैठकीत पालकमंत्री देशमुख बोलत होते💥 

लातूर,(प्रतिनिधी) : शासनाने अनलॉक 1 व अनलॉक 2 मध्ये नागरिकांना प्रवासाच्या काही अटीवर सवलती दिलेल्या आहेत. त्यामुळे लातूर जिल्हयात परराज्य व पर जिल्हयातून नागरिक येत असल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. परंतु हा प्रार्दुभाव वाढू न देण्यासाठी जिल्हा प्रशासन व सर्व संबंधित तालुका प्रशासनाने जिल्हयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करावी असे आवाहन वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कोव्हीड-19 बाबतच्या आढावा बैठकीत पालकमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलिस अधिक्षक रोजेंद्र माने, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, महापालिका आयुक्त देवीदास टेकाळे, अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी , तहसिलदार , गट विकास अधिकारी व विभागप्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले की, कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव थांबविण्यासाठी सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांनी पर जिल्हा व परराज्यातून येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवावे. त्या नागरिकांची तात्काळ आरोग्य तपासणी करावी. तसेच रेड झोनमधून येणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी बरोबरच आवश्यक वाटत असेल तर होम क्वारंटाईन व संस्थात्मक विलगीकरण ही करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले.
जिल्हयातील नागरिकांनी शासन व प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे. अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर मास्क घालून पडावे त्याप्रमाणेच जिल्हा प्रशासनाने 60 वर्षे वयाच्या नागरिकांनी दुकानांवर बसणे व काम करण्यास मनाई केली आहे. त्याचे पालन व्हावे, असे आवाहन पालकमंत्री देशमुख यांनी केले.
लॉकडाऊनच्या सुरुवातीपासून ते अनलॉक -1 पर्यंत जिल्हा प्रशासनाने चांगले काम केले असून या काळात रुग्णांची संख्या अत्यल्प होती. परंतु शासनाने अनलॉक 1 व 2 मध्ये नागरिकांना काही अटीवर प्रवास करण्यास परवानगी दिली. व सर्व व्यवहार व्यवसाय सुरु झाले. यामुळे कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. ही संख्या अधिक वाढू न देता प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन देशमुख यांनी केले.
महानगरपालिका क्षेत्रात व सर्व नगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू नये याकरिता शहरांच्या प्रवेशाच्या ठिकाणी चेक पोस्ट तयार करावेत, नियमानुसार आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करावी. व कोणतीही परवानगी न घेता आलेल्या नागरिकांची ही आरोग्य तपासणी करुन त्यांना विलगीरकण कक्षात ठेवावे, अशी सूचना देशमुख यांनी केली.
यावेळी पालकमंत्री देशमुख यांनी तहसिल निहाय कोरोनाचा आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी प्रशासनाने कोरोनाच्या प्रतिबंधासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. प्रारंभी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ढगे यांनी जिल्हयातील कोरोना बाधितांची माहिती देऊन दैनंदिन स्वॅब तपासणीची माहिती दिली...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या