💥नांदेडच्या लॉकडाऊनचा निर्णय आज होणार...!💥 पालकमंत्र्यांची संमती; व्यापारी संघटनेशी चर्चा विचार मन केल्याशिवाय निर्णय नाही: जिल्हाधिकारी💥

नांदेड,दि.७ ः कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने ती नियंत्रणात आणण्यासाठी इतर जिल्ह्याप्रमाणे नांदेड जिल्ह्यातही काही दिवस लॉकडाऊन करण्याची दाट शक्यता आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी नांदेडमध्ये जिल्हास्तरीय यंत्रणेसोबत घेतलेल्या बैठकीत सर्व परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्यासाठी हिरवा कंदील दर्शविला. याबाबत व्यापारी संघटनांशीही चर्चा केल्यानंतर किती दिवस लॉकडाऊन ठेवायचा यावर निर्णय घेतला जाणार आहे. 

बीड, परभणी, हिंगोली, जालना व औरंगाबाद या पाचही जिल्ह्यांनी काही दिवस कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. काही ठिकाणी तर मेडिकल आणि किराणा दुकानही बंद ठेवून संचारबंदी लागू करण्याचा निश्चय केला. परंतु, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांमध्ये यावर अंतिम निर्णय घेण्यात आला नाही. नागरिकांमधून गेल्या आठवड्याभरात प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर जिल्हा प्रशासन सावध झाले असून, या विषयात पालकमंत्र्यांची भूमिकाही जनतेच्या बाजुने असल्यामुळे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
नांदेड जिल्ह्यातील रूग्णसंख्या सोमवारी 458 वर पोहोचली असली तरी यातील 104 रूग्ण सध्या उपचार घेत आहेत. उर्वरितपैकी 20 रूग्णांचा मृत्यू झाला असून 334 रूग्णांना बरे करून घरी सोडण्यात आला आहे. गेल्या दहा दिवसांत सव्वाशेच्या आसपास नवे रूग्ण आढळल्यामुळे नागरिकांमधून काळजी व्यक्त केली जात आहे. एका कन्टेनमेंट झोनच्या बाजुला दुसरे रूग्ण आढळत असल्याने हा प्रकार नेमका काय आहे, हेच अनेकांना समजेनासे झाले आहे. काही जणांनी हवेतून कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे अनुमान काढले तर काहीजण साध्या आजारानंतरही कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह येत असल्याची भिती व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर बाधित आढळलेले रूग्ण व त्यांचे कुटुंबियांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागत आहे.
गेल्या 22 मे पासून जिल्ह्यातील बाजारपेठ पुर्ववत सुरू झाली. काही दिवसांपुर्वी सलूनची दुकानेही सुरू झाली. शासनाने सोमवारी घेतलेल्या निर्णयानुसार 33 टक्के क्षमतेने हॉटेल्स सुरू करण्याकडे वाटचाल आहे. परंतु, दुसरीकडे रूग्णांची संख्या मात्र वाढत चालली असल्याने लॉकडाऊन करण्याशिवाय स्थानिक प्रशासनाकडे कोणताही पर्याय दिसून येत नाही. मधील काळात बाहेरील अडकलेले लोक आपआपल्या गावी परतले असले तरी सध्या येणारे व जाणारे लोक पुन्हा आपल्या इच्छित ठिकाणी निघून जावे इतका वेळ देऊन कडक लॉकडाऊन करण्याचा विचार जिल्हा प्रशासनाकडून केला जात आहे.
पुन्हा लॉकडाऊन केल्यानंतर कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल याचाही विचार अगोदरच करून घेतला जात असून, काही कामगार व हातावर पोट असलेल्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून कराव्या लागणार्‍या मदतीचाही आढावा घेण्यात आला. याबाबत व्यापारी संघटनांशी चर्चा करून 9 किंवा 10 जुलैपासून नांदेड जिल्ह्यात कडक संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. हा लॉकडाऊन प्राथमिक स्वरूपात दहा ते बारा दिवसांचा असेल. रूग्णांची संख्या अशीच वाढत गेल्यास त्यात वाढ होऊ शकते, असेही सुत्रांकडून सांगण्यात आले.

*आणखी निर्णय झाला नाही ः प्रशासन*

लॉकडाऊन पुन्हा कडक करण्याचे कोणतेही आदेश अद्याप देण्यात आलेले नाहीत. जिल्ह्यातील सर्व परिस्थितीचा व प्रातिनिधीक स्वरूपात समाजातील सर्व घटकांचा विचार करून आवश्यकता भासल्यास निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केल्याचे जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी व्हॉटस्अपवर कळविले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या