💥महानायक अमिताभ बच्चन कुटुंबातील सुन ऐश्वर्या राय व नात आराध्या कोरोना पॉझिटिव्ह....!💥अमिताभ यांच्या पत्नी जया बच्चन कोरोना चाचणी रिपोर्ट आला निगेटिव्ह💥

मुंबई,(प्रतिनिधी) : शनिवारी महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन या पिता-पुत्रांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर आज दुपारी ऐश्वर्या राय-बच्चन आणि आराध्या बच्चन या दोघींची दुसरी चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. माजी खा. जया बच्चन यांची मात्र टेस्ट निगेटिव्ह आली आहे. काल जया, ऐश्वर्या, आराध्या बच्चन यांची पहिली चाचणी निगेटिव्ह आल्याचे वृत्त होते. परंतु आज दुपारी ऐश्वर्या आणि लहान मुलगी आराध्या या दोघांचा अहवाल सकारात्मक आलेला आहे. सध्या या दोघीही १४ दिवसांसाठी घरीच स्वतः हून क्वारंटाईन झालेल्याची माहिती अभिषेक बच्चनने ट्विट वरून दिलेली आहे.

परिणामी अमिताभ बच्चन यांच्या मालकीचे सर्व प्रतीक्षा, जलसा, जनक हे बंगले बृहन्मुंबई महापालिकेकडून सील करण्यात आलेले आहेत. हे सर्व बंगले सॅनिटाईज करण्याचे कामही सुरू झालेले असून हे बंगले असलेले सर्व परिसर कन्टेन्मेंट झोन घोषित करण्यात आलेले आहे.  दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या मालकीच्या सर्व बंगल्यांवरील 58 पैकी 28 कर्मचार्‍यांचा अमिताभशी गेल्या 10 दिवसांमध्ये संपर्क आल्याने ते क्वारंटाईन झालेले आहेत. अमिताभ आणि अभिषेक या दोघांवर नानावटी रुग्णालयात काल रात्रीपासून उपचार सुरू असून दोघांनाही कोरोनाची सौम्य लक्षणे आढळलेली असून त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तसेच ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांचा बंगलाही सील करण्यात आलेला आहे.
बच्चन यांच्या कुटूंबातील आणि कर्मचारी मिळून अशा एकूण 30 जणांची चाचणी घेण्यात आली आहे. ज्यात रक्षक आणि इतर कर्मचार्‍यांचा समावेश आहे. उद्या अन्य अहवाल येतील, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले. ते पुढे म्हणाले, ऐश्वर्या आणि आराध्या या दोघींना अतिशय सामान्य लक्षणे आढळून आले असून त्यांनी स्वतःहून घरीच उपचार घेण्याचे लेखी कळवले आहे. गरज पडल्यास त्यांनाही रुग्णालयात हलवले जाईल.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, , आज सकाळी बीएमसीने अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थानांवर स्वच्छता केली आहे आणि आजपासून ते कंटेन्टमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. कोणालाही घराबाहेर प्रवेश करू शकणार नाही किंवा बाहेर पडू देणार नाही. मुंबई पोलिसांनीही तेथे बॅरिकेडिंग केली आहे. फक्त आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्यास परवानगी असेल.
नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने सांगितले की, अमिताभ बच्चन यांची प्रकृती सौम्य कोरोनाच्या लक्षणांमुळे स्थिर आह.  सध्या त्यांना एका वेगळ्या कक्षामध्ये उपचार सुरू आहेत.
अनुपम खेर यांच्या कुटूंबातील चौघे पॉझिटिव्ह!
दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या कुटूंबातील चार सदस्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. अनुपम खेर यांची आई, भाऊ आणि वहिनी, पुतणी या चौघांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला असल्याचे स्वतः अनुपम खेर यांनी ट्विट संदेश करून म्हटले आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षण आढळून आलेली असून त्यांच्यावर कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्वतः अनुपम खेर यांची टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या