💥परळी एसबीआय बँकेतील कोरोना बाधीताच्या संपर्कातील 1418 लोकांची होणार कोरोनाची टेस्ट....!
💥स्वॅब घेण्याची व तपासणीसाठी पाठविण्याची प्रक्रिया परळीतील आरोग्य प्रशासनाच्या वतीने केली जात आहे💥


💥सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आरोग्य प्रशासन कमालीचे सतर्क💥

परळी (दि.१० जुलै) – शहरातील एसबीआय बँकेच्या मुख्य शाखेतील काही कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर परळी शहरातील कोरोनाचे मिटर काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. बँकेतील कर्मचारी व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती आरोग्य प्रशासन आता अधिक सतर्क झाले असून संसर्ग आटोक्यात ठेवण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गेल्या 25 जून 2020 पासून बँकेच्या संपर्कात आलेल्या शहरी व ग्रामीण भागातील 1418 लोकांची कोरोनाची टेस्ट आरोग्य प्रशासनाच्या वतीने करणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे यांनी सांगितले.


याबाबत आरोग्य प्रशासनाकडून प्राप्त माहिती अशी की शहरातील एसबीआयच्या मुख्य शाखेतील काही कर्मचारी कोरोना बाधित आढळल्यानंतर बँकेमध्ये आलेल्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग पूर्ण झाले असून 25 जून 2020 नंतर शहर व ग्रामीण भागातील जवळपास 1418 लोकांचा व्यवहाराच्या व इतर कामांच्या निमित्ताने बँकेशी संपर्क आला आहे. त्यानंतर बँकेचे काही कर्मचारी त्यांचे कुटुंबीय व दोन ग्राहक कोरोनाग्रस्त आढळल्यानंतर आरोग्य प्रशासन अधिक सतर्क झाले असून खबरदारीचा उपाय म्हणून त्या 1418 व्यक्तींची आता कोरोनाची तपासणी करण्याचे आरोग्य प्रशासनाने निश्चित केले आहे.या सर्वांना स्वेब घेण्यासाठी येथीलच डॉ बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहात बोलवण्यात येणार असून शुक्रवारपासून टप्याटप्याने स्वॅब घेऊन पुढील तपासणीसाठी अंबाजोगाई येथिल कोव्हीड 19 टेस्टिंग सेंटरला पाठविण्यात येणार आहेत. यासाठी माजलगाव वडवणी आदी ठिकाणाहून स्वॅब केबिन मागविण्यात येणार असून एकूण चार केबिनच्या माध्यमातून स्वॅब घेतले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. प्रथमतः शहरी भागातील 816 तर तदनंतर ग्रामीण भागातील जवळपास 500 लोकांचे स्वॅब घेतले जाणार असून याकामी नगरपालिका प्रशासन गटविकास अधिकारी ग्रामसेवक आदि प्रशासनाच्या विविध विभागांची मदत घेतली जाणार आहे. ही प्रक्रिया सुरक्षेच्या सर्व उपायोजना अवलंबत सोशल डिस्टन्स पाळत पार पडणार असल्याचे आरोग्य प्रशासनाच्यावतीने तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे यांनी सांगितले असून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वॅब घेण्याची व तपासणीसाठी पाठविण्याची प्रक्रिया परळीतील आरोग्य प्रशासनाच्या वतीने केली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या