💥गंगाखेड येथील श्रध्दा ट्रेडिंग कंपनीच्या गोदामावर धाड,शासकीय स्वस्त धान्याचा साठा जप्त...!


💥महसुल व पोलीस प्रशासनाद्वारे कसुन तपासणी सुरू,एक ट्रक धान्यसाठा ताब्यात💥

परभणी (दि.०७ जुन)-जिल्ह्यातल्या गंगाखेड शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी विजयकुमार शर्मा यांच्या श्रध्दा ट्रेडिंग कंपनीच्या गोदामावर महसुल व पोलिस प्रशासनाने काल शनिवार दि.०६ जुन २०२० रोजी रात्री संयुक्तपणे छापा टाकला. त्या गोदामातील धान्याच्या साठ्याची या पथकाने आज रविवार दि.०७ रोजी पहाटेपर्यंत कसून तपासणी केली. तेव्हा गोदामातील गहू आणी तांदुळाचा साठा सकृतदर्शनी राशनचाच असल्याची माहिती हाती आली आहे.


सविस्तर वृत्त असे की काल ०६ जून २०२० रोजी सायं.०५-०० वाजेच्या सुमारास गव्हाच्या पोत्याने भरलेला एक ट्रक ज्याचा क्रमांक एम.एच.-२२-एच-१८१४ हा शहराबाहेर जात होता. त्या ट्रकमधला गहू राशनचा असल्याचा कानोसा पोलिसांना लागला. गंगाखेड पोलिस ठाण्याचे निरीक्षक वाय. एन. शेख, सहाय्यक पोलिस निरीक्षक कोकाटे, पोलिस कर्मचारी मस्के, उमर व पठाण यांनी तो ट्रक थांबवून चौकशी सुरू केली. ट्रक चालक मुरलीधर बेले याने उडवाउडवीची उत्तरे दिली.पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने ट्रकसह ट्रकमधील मालाची कागदपत्रे नसल्याची माहिती दिली. तेव्हा पोलिसांचा संशय बळावला. ट्रक चालक बेले याने श्रध्दा ट्रेडिंग कंपनीच्या गोदामातून आपण ट्रकद्वारे पोते घेवून बाहेर निघाल्याची माहिती दिली. संशय दृढ होताच पोलिसांनी महसुल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या ही बाब तात्काळ निदर्शनास आणली. तेव्हा उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार स्वरूप कंकाळ, पोलिस निरीक्षक शेख यांनी सायं.०६-०० वाजेच्या सुमारास थेट गोदाम गाठून तपासणी सुरू केली. रात्री उशिरापर्यंत ती तपासणी सुरू होती. गोदामात गहु आणि तांदूळाचा साठा असल्याचे गोदाम मालक शर्मा यांनी म्हटले. प्रशासनाने पहाटे पर्यंत धान्य खरेदी-विक्रीच्या पावत्याची चौकशी सुरू केली. तेव्हा गोदाम मालकाने आपणास राशनच्या दुकानावरून उचलेला गहू आणि तांदूळ काही नागरिकांनी आणून विकल्याचा खुलासा केला. दरम्यान,  उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी त्या अनुषंगाने यंत्रणेमार्फत आपण तपास करीत असल्याची माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना दिली...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या