💥परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीत भ्रष्टाचारी कोरोना विषाणूंचा हैदोस ?


💥कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किट्स,सॅनिटायझर वाटप व फवारणीच्या नावाने तब्बल १ कोटी ५० लक्ष रुपयांचा भ्रष्टाचार💥  
परभणी (दि.08 जुन) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती आर्थिकदृष्ट्या पूर्णतः डबघाईस असतांना पदाधिका-यांसह संचालक मंडळाने जिल्हा उपनिबंधकाच्या संगनमताने गरजूंना किट्स, सॅनिटायझर वाटप व फवारणीच्या नावाखाली दीड कोटी रुपये हड़पल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संतोष देशमुख यानी जिल्हाधिकारी याना निवेदन देऊन केला आहे.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बाजार समितीने गरजू व्यक्तींना जेवण, धान्याचे किट्स, व्यापा-यांना सॅनिटायझर व परिसरात फवारणी इत्यादी कामासाठी दीड कोटी रुपयांचा खर्च केला. त्यापैकी बहुतांश खर्च कागदोपत्रीच केला आहे. त्यासाठी बनावट दस्तावेज तयार करण्यात आले आहेत. जिल्हा उपनिबंधकांनी या प्रकरणात समितीच्या संचालक मंडळासह अधिका-यांच्या या गैरप्रकाराकडे पूर्णतः कानाडोळा केला. तसेच खर्चास पूर्णतः नियमबाह्य पध्दतीने मान्यता बहाल केली. बाजार समितीच्या उत्पन्नाचा विचार सुध्दा केला नाही. मार्च 2019 ते जून 2020 चे उत्पन्न, नफा त्याची टक्केवारी वगैरे गोष्टीचा विचार गांभिर्याने करणे गरजेचे असतांना बाजार समितीने, जिल्हा उपनिबंधकांनी त्याकडे पूर्णतः कानाडोळा करीत खुलेआमपणे गैरप्रकार केल्याचा आरोप देशमुख यांनी केला.
याच बाजार समितीने अंदाजे 7 हजार कापूस उत्पादक शेतक-यांनी ऑनलाईन व 3  हजार कापूस उत्पादक शेतक-यांनी ऑफलाईन पध्दतीने कापूस विक्रीसाठी नोंद केली होती. बाजार समितीने दोन्ही प्रक्रिया डावलून 1 हजार पेक्षा जास्त व्यक्तींना कापूस खरेदीसाठी टोकन वितरीत केले व  हितसंबंंधीत व्यक्तींचा पध्दतशीरपणे फायदा करून दिला. या दोन्ही घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी व दोषी विरूध्द कठोर कारवाई करावी, अशी मागणी तालुकाध्यक्ष देशमुख यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनाची एक परत राज्याच्या सहकारमंत्री यांना पाठविली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या