💥औरंगाबाद येथील घाटी व मिनी घाटीसाठी रुग्णालयांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही - अमित देशमुख💥शासन कोरोना योध्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल असेही वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख म्हणाले💥

औरंगाबाद, दिनांक 06  (जिमाका) :- कोरोनाचा (कोविड- 19) प्रसार रोखण्यासाठी विभागीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, आरोग्य, पोलीस विभाग उत्तम कार्य करीत असून शासन कोरोना योध्यांच्या पाठिशी आहे. औरंगाबाद जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांमध्ये गती आणण्याकरिता घाटी व मिनी घाटीला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. 


विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केल्या जाणाऱ्या उपाययोजना तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये देण्यात येत असलेल्या सेवा-सुविधा, आवश्यक वैद्यकीय साधनसामग्री व आगामी काळात करावयाच्या उपाययोजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक श्री. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, महानगर पालिका आयुक्त आस्तिक कुमार पांण्डेय, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, उपायुक्त वर्षा ठाकूर, पराग सोमण, पोलीस उपायुक्त नीतेश खाटमोडे, शासकीय वैद्यकीय महाविदयालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, मनपा वैदयकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, उपसंचालक आरोग्य सेवा डॉ.स्वप्नील लाळे, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री.देशमुख यांनी संबंधीत विभागांच्या अधिकाऱ्यांकडून कोरोना प्रतिबंधाच्या पार्श्वभूमीवर केल्या जाणाऱ्या उपाययोजना, ग्रामीण व शहरी भागातील रुग्णालयांमध्ये देण्यात येणाऱ्या सेवा सुविधा, वैद्यकीय साधन सामुग्रीची उपलब्धता व आवश्यकता आणि आगामी काळात करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली.
श्री. देशमुख म्हणाले की, कोरोनाच्या अनुषंगाने घ्यावयाच्या दक्षतेबद्दल जनजागृतीवर भर देणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात तोंडाला मास्क लावणे बंधनकारक करावे. कोविड बरोबरच अन्य आजारांच्या रुग्णांकडे दुर्लक्ष करु नये, याची दक्षता घ्यावी.  तसेच या काळात आरोग्य व अन्य विभागात कार्यरत असणाऱ्या डॉक्टर, परिचारीका, स्वच्छता कर्मचारी आदींना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, याची दक्षता घेवून आवश्यक तपासणी करुन घ्यावी, असे सांगून कोरोनामुळे आजवर काहींना आपला जीव गमवावा लागला, त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी शासन आहे.   शहरातील कोरोना (कोविड-19) मुळे होणारे मृत्युदर व रुग्णदर कमी करण्याच्या दृष्टीने उपाय योजनांना गती दयावी. कोविड रुग्णांना तात्काळ उपचार दयावेत. पारिचारक, वॉर्डबॉय यांचे वेतन वेळेवर करण्याबाबत दक्षता घ्यावी. रुग्णांचे मनोधैर्य वाढण्यासाठी समुपदेशनावरही भर द्यावा. उपाययोजना म्हणून  निर्धारीत करण्यात आलेला औषधोपचार करावा.
महसूल राज्यमंत्री श्री. सत्तार यांनी प्रशासनाव्दारे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त करीत जनजागृती, समुपदेशन आणि तपासणी या कामास अधिक गती देण्याची सूचना केली.
श्री. केंद्रेकर म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, महानगर पालिका, आरोग्य विभागाकडून उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील लोक नियमांचे काटेकोरपण पालन करीत आहेत. महापालिकेने तयार केलेला ‘माझी हेल्थ माझ्या हाती’ या ॲपमुळे नागरिकांमध्ये कोरोनाविषयी मोठया प्रमाणात जनजागृती निर्माण झाली आहे. यावेळी जिल्हाधिकारी श्री. चौधरी यांनी शहरी व ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. मनपा आयुक्त श्री. पांण्डेय यांनीही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा क्षेत्रात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. जनजागृतीसाठी ‘माझी हेल्थ माझ्या हाती’ या ॲपची निर्मिती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या ॲपचे वैशिष्ट्य त्यांनी यावेळी विषद केले.
 जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोंदावले यांनी ग्रामीण भागात कारोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. 'जिल्हा परिषद आपल्यादारी' या अभियानातून ग्रामीण भागात जनजागृती करण्यात येत असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील संशयित रुग्णांवर त्याच भागातील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याचे सांगून गंभीर रुग्णास घाटीत नेले जाते. लॉकडॉऊनच्या  शिथिल  काळात तसेच त्यानंतर भविष्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी  पल्सरेट ऑक्सीमीटर, सॅनिटाइझर, मास्कचा वापर व सुरक्षित अंतर पाळणे याचा अवलंब करण्याबाबत जनजागृती करण्यावर भर दिला जात आहे असे त्यांनी सांगितले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या