💥प्रबोधनकार ठाकरे यांच्या खोलीत अवघ्या १८ जणांच्या साक्षीने ‘शिवसेने’ची स्थापना झाली...!💥बलाढ्य शिवसेनेचा..अजरामर इतिहास..
भाग - १

महाराष्ट्राला संघर्षाचा इतिहासच लाभलेला आहे..सोबतीला सह्याद्री असल्यावर इथे जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसात लढण्याची ताकद आहे.. पण ती ताकद मराठी माणुस विसरला होता..धमन्यांमध्ये ताकद तर होती पण विश्वास नव्हता..सळसळणार रक्त शांत झालं होत..अशा वेळी कमी होती ती त्या ताकदीची जाणीव करून देणाऱ्या बुलंद नेतृत्वाची आणि बलाढ्य संघटनेची..छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांनंतर भगव्या झेंड्याचा झंझावात काही प्रमाणात थंड झाला होता.. भगव्या झेंड्याची ताकद रयत विसरली होती.

 शांत निपचीत पडलेला भगवा मराठी माणसाच्या खांद्यावर देऊन अन्याय अत्याचाराच्या विरोधात रणशिंग फुंकून दिल्लीच्या तख्ताला आव्हान देण्याची वेळ आली होती.. हर हर महादेवची' गर्जना मराठी माणसाच्या मनात पुन्हा एकदा घुमायला हवी आणि प्रत्येक मराठी माणसाने महाराष्ट्राचा स्वाभिमान मनात बाळगायला हवा असं बाळासाहेबांना मनोमन वाटू लागलं..संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात एकत्र आलेला मराठी आवाज महाराष्ट्र राज्याच्या स्थापने नंतर मात्र काहीसा विखुरला गेला होता.. आचार्य अत्रे ‘मराठा’च्या आणि बाळासाहेब ठाकरे ‘मार्मिक’च्या माध्यमातून या लढय़ात अग्रेसर राहिले..महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील नेते इतस्तत: विखुरले. काहींनी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील राजकारणाची कास धरली. स्वतंत्र राज्य मिळवूनही त्याचे नेतृत्व करणे समितीला साधले नाही. समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट, शेतकरी कामगार पक्ष आदींना त्यानंतर कधी राज्यपातळीवर जाता आले नाही. ही पाश्र्वभूमी व परप्रांतीयांचे मुंबईत होणारे मोठय़ा प्रमाणावरील स्थलांतर, परिणामी मराठी भाषक राज्यात मराठी माणसाचीच गळचेपी होत आहेयाच दरम्यान मुंबईसह महाराष्ट्र व्हावा म्हणून १०५ जणांनी हुतात्मा पत्करलेल्या मुंबईत मात्र स्थलांतर, परप्रांतीयांचे प्रमाण वाढीस लागून मराठी मुलुकात मराठी माणसाचीच अवहेलना, कुचंबना होत असल्याच्या धर्तीवर त्याच सुमारास सुरु झालेल्या मार्मिक या व्यंगचित्र आधारीत साप्ताहिकातून प्रबोधनकार ठाकरे यांचे सुपुत्र व्यंगचित्रकार बाळ ठाकरे यांनी समाजाच्या आणि विशेष करून तरुणांच्या मनातील खदखद जाणून आपल्या कुंचल्याच्या फटकाऱ्यातून मराठी माणसांवरील अन्यायाला वाचा फोडण्याचे कार्य हाती घेतले. महाराष्ट्रात निर्माण झालेले - मराठी द्वेषाचे व मराठी माणसांवरील अन्यायाचे - व्यंग केवळ चित्रांनी दूर होणार नाही. त्यासाठी आणखी संघटित प्रयत्न करायला हवेत असा विचार बाळासाहेबांनी केला. 'बाळासाहेबांच्या या कार्यास लोकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून भूमीपुत्रांच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी संघटना असावी या विचारातून,तसेच मुंबई आणि महाराष्ट्र मध्ये मराठी माणसांवर होणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात १९ जून १९६६ रोजी संघटनेची स्थापना झाली..एक दिवशी प्रबोधनकार ठाकरेंनी प्रश्न विचारला..“बाळ लोके तर जमली पण याला संघटनेचे रूप देणार की नाही? काही नाव सुचतंय का संघटनेसाठी?” बाळासाहेब बोलले ..विचार तर चालू आहे..पण संघटनेला नाव..!! तितक्यात प्रबोधनकार बोलले मी सांगतो नाव….....शिवसेना........शिवरायांच्या विचारांची सेना.. मग ठरलं,यानंतर अखेर बाळासाहेबांनी जून १९, १९६६ रोजी #शिवसेनेची स्थापना केली..

प्रबोधनकार ठाकरे यांच्या खोलीत अवघ्या १८ जणांच्या साक्षीने ‘शिवसेने’ची स्थापना झाली.छत्रपती शिवाजी महाराज हे शिवसेनेचे आराध्य दैवत आणि महाराज भवानी मातेचे भक्त.. आई भवानी मातेचे वाहन असलेला वाघ हे शिवसेनेचे बोधचिन्ह खुद्द बाळासाहेबांनी साकारले..३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवतीर्थावर आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या पहिल्या मेळाव्यास मुंबई आणि महाराष्ट्र भारातून भरघोस प्रतिसाद लाभला.. या मेळाव्यापासूनच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि शिवतीर्थावरील मराठी माणसांची प्रचंड गर्दी यांच्यामध्ये नातेसंबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली.. दक्षिण भारतीयांविरोधातली मोहीम, शिवसेनेची स्थापना, महाराष्ट्र मुक्तीचा लढा, सरकारला दिलेली पहिली धडक, भूमिपुत्रांसाठीचा लढा, मराठी चित्रपटांसाठी जास्त खेळ, मराठी माणसांचा नोकरीत हिस्सा, मराठी तरुणांच्या रोजगाराच्या निमित्ताने वडापावचा जन्म, गरिबांसाठी मोफत रुग्णवाहिका, 20 टक्के राजकारण अन्‌ 80 टक्के समाजकारण असे मुद्दे घेऊन महाराष्ट्राचा आवाज देशात बुलंद करण्यास प्रारंभ झाला..

मराठी माणसासाठी लढणारी आक्रमक संघटना यापुरतीच शिवसेनेची कार्यकक्षा सीमित होती..स्थापनेनंतर एक महिन्याने झालेल्या बैठकीत उपस्थितांनी शपथ घेतली..या शपथेचा मसुदा लिहिला गेला..आपली मालमत्ता परप्रांतीयांना विकू नये, मराठी ग्राहकांशी विनयाने वागावे, मराठी नोकर नेमावे, मराठी शाळा, संस्थांना मदत करावी, मराठी बांधवांची गृहरचना संस्था काढावी, मराठी सण-समारंभांत भाग घ्यावा, मराठी बांधवांच्या मदतीला धावा याबरोबरच इंग्रजी टायपिंग शिकावे, आळस झटका, उडपी हॉटेलवर बहिष्कार टाकावा, मराठी व्यावसायिकाची उमेद वाढवा, त्याला नामोहरम करू नका, राज्यात कोठेही काम करण्याची मानसिकता जोपासा ही शपथपत्रातील कलमे तेव्हाच्या शिवसेना नेतृत्वाच्या मानसिकतेची साक्ष देतात.. मराठी भाषा, मराठी अस्मिता, मराठी संस्कृती, शिवाजी महाराजांचा तेजस्वी वारसा हे सर्व जपण्याची आणि समृद्ध करण्याची जबाबदारी इतिहासानं आपल्यावर सोपवली आहे. मराठी तरुणांनी तो वसा घेतला पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं..मराठी अस्मितेसाठी सुरू झालेल्या शिवसेनेला पुढे बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा डोस देऊन मराठी अस्मितेच्या परिघाबाहेर नेले..त्या काळात अनेक आरोप शिवसेनेवर होत होते यासाठीच बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर सामना हे शिवसेनेचे मुखपत्र काढले.२३ जानेवारी, १९८९ रोजी मध्यरात्री शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ सुरू झाले. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात, मोठ्या थाटामाटात शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते ‘सामना’चे प्रकाशन करण्यात आले. प्रकाशन प्रसंगी बोलताना बाळासाहेब ठाकरे म्हणाले, “हिंदुत्वाचा प्रभावीपणे प्रचार करण्यासाठी आणि दररोज होणाऱ्या आरोपांना उत्तर देण्यासाठी, सामना हे नवे शस्त्र असेल आणि उद्या पाळी आली तर, आम्हाला खऱ्या शस्त्रालाही हात घालावा लागेल असं म्हणत काँग्रेसला एक सज्जड दमच दिला होता..

हवे असलेले भाषिक राज्य मिळाल्यानंतरही “आपले प्रश्‍न काही सुटत नाहीत” अशी भावना मुंबईतील मराठी माणसाच्या मनात निर्माण झाली. कोणी या संघटनेच्या स्थापनेमागे आणखी काही कारणं असल्याचं सांगतात. पण, या पार्श्‍वभूमीवर मराठी माणसांच्या हक्‍कांचा विषय अजेंड्यावर आणणारी “शिवसेना” स्थापन झाल्यामुळे साहजिकच मराठी माणसाला एक भक्कम आधार सापडला होता, यात शंकाच नाही.

त्यात आणखी एक बाब म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नेतृत्व हे प्रस्थापित सर्वच राजकीय नेत्यांपेक्षा वेगळे आणि मुख्य म्हणजे अत्यंत आक्रमक होते. बाळासाहेबांची वेशभूषा, त्यांच्या तोंडातील पाईप, त्यांच्या भाषणाची “ठाकरे शैली” अशा रोखठोक वाक्‍यांपलीकडली बिनधास्त शैली आणि मुख्य म्हणजे ‘मार्मिक’मधील बोचऱ्या व्यंगचित्रांमुळे त्यांच्याभोवती निर्माण झालेले वलय आदी विविध कारणांमुळे मुंबई-ठाणे परिसरातील मराठी माणसांचा एक मोठा समूह त्यांच्याकडे ओढला गेला..राजकारणात पकड बसवतांनाच सर्व अडचणी आणि कटकटी यांमधून सामना दैनिकासारखा व्याप अंगावर घ्यायचा म्हणजे हल्लीच्या काळात द्रोणागिरी पर्वत उचलण्यासारखाच प्रकार म्हणायचा...परंतु हे मारुतीचे बळ केवळ जनता जनार्दनाने बाळासाहेबांना दिले आणि त्या बळावरच हे पर्वतप्राय कार्य शिवसेना करू शकली..

पक्षस्थापनेनंतरच्या पहिल्या दसरा मेळाव्यात (१९६६) ‘राजकारण म्हणजे गजकर्ण’ म्हणणारे बाळासाहेब नंतर राजकीय खेळी लीलया खेळू लागले ते मराठी माणसाच्या कल्याणासाठीच..अन्यायाच्या विरोधात आवाज उठवत असल्याने कधी तेव्हाचे राजकारणी पक्ष ऐकायचे नाही मग प्रसंगी हाणामारीची करावी लागली..रस्त्यावरील हाणामारींमुळे राजकारणात शिवसेनेला पूर्वी मित्र मिळत नव्हते..काही घटनांमुळे शिवसेनेला जवळ करणे इतर राजकीय पक्षांना गैरसोयीचे वाटे..तथापि, बाळासाहेबांनी याच काळात हिंदुत्वाला अग्रभागी आणले..

त्या पहिल्या सभेत आणि पाठोपाठ जो एल्गार दिला गेला तो होता दाक्षिणात्यांच्या लुंगीवाल्यांच्या विरोधात..नोकरी विश्वातील 'मक्तेदारी'वर. त्या एल्गारानंतर वर्षभरात मुंबईचं वातावरण हळूहळू दाक्षिणात्यांच्या विरोधात तंग होत गेलं..
वर्षभरानंतर आलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं मुख्यत: आचार्य अत्रे, कॉम्रेड डांगे, जॉर्ज फर्नांडिस, कृष्ण मेनन यांच्याविरुद्ध प्रचाराची मोहीम उघडली. शिवसेना थेट राजकारणात उतरली नव्हती. पण राजकीय रंग दाखवू लागली होती..उधळू लागली होती..

शिवसेना स्थापनेच्या काळात म्हणजे १९६६च्या सुमारास, मुंबईमधल्या गिरणी कामगारांवर कम्युनिस्टांचा पगडा होता. शिवसेना सुरुवातीपासून कम्युनिस्ट विरोधी होती.. मुंबईमधल्या गिरण्यांमधून शिवसेनेने व भारतीय कामगार सेनेने कम्युनिस्टांना जवळपास हद्दपार केले आणि मुंबईच्या मराठी कामगारांमध्ये शिवसेना व बाळासाहेब अनभिषिक्त सम्राट झाले. मुंबईमध्ये जरी शिवसेनेचा जन्म झाला असला आणि तिची मुळे मुंबईत रुजली असली तरी शिवसेनेला पहिले राजकीय यश ठाण्यात मिळाले.

शिवसेना स्थापन झाली तेव्हा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण होऊन फक्त सहा वर्षं झाली होती..लालबहाद्दूर शास्त्रींच्या आकस्मिक निधनानंतर जानेवारी १९६६ मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या..त्यावेळची आर्थिक स्थिती विलक्षण खालावलेली होती.औद्योगिक मंदीमुळे नोकऱ्या उपलब्ध होत नव्हत्या..महागाईमुळे लोक त्रस्त होते..अवघ्या मुंबईत संप-टाळेबंदी लाट उसळली होती..मुंबईचा, मुख्यत: लालबाग, परळचा रंग लाल असंतोषानं व्यापलेला होता..
काँग्रेसला कम्युनिस्ट कामगार संघटनांना आटोक्यात ठेवता येत नव्हतं. १९६७ च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला जेमतेम बहुमत मिळालं..तसचं,आठ राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला..

तामिळनाडूमध्ये द्रमुक हा प्रादेशिक पक्ष, पंजाबमध्ये अकाली दल, पश्चिम बंगालमध्ये बांगला काँग्रेस आणि कम्युनिस्ट, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात काँग्रेसविरोधी पक्षांची (मुख्यत: स्थानिक-प्रादेशिक पक्षांची) आघाडी असं वातावरण होतं. एकूणच देशात प्रादेशिक, भाषिक, जातीय आणि धार्मिक संघटनांचा जोर उफाळून आला होता आणि मुंबई-महाराष्ट्रात शिवसेनेचा..गेल्या ५० वर्षांत सगळ्या नद्यांमधून खूप पाणी वाहून गेलं आहे,प्रदूषितही झालं आहे. जवळजवळ सर्व पक्षांचे संस्थापक नेते अंतर्गत बंडाळी होऊन पदच्युत झाले..द्रमुकचे करुणानिधी यांच्या विरोधात एम. जी. रामचंद्रन यांनी बंड करून अण्णा द्रमुकची स्थापना केली. अकाली दलाचे तारासिंग-फत्तेसिंग अस्तंगत झाले. बांगला काँग्रेस लयाला गेली. संयुक्त विधायक दलांच्या रूपानं उभ्या राहिलेल्या काँग्रेसविरोधी आघाड्या कोलमडल्या.

जनता पक्षाचा उदय होऊन तीन-चार वर्षांतच अस्तही झाला. जनसंघाचे एक संस्थापक बलराज मधोक (ज्यांचं अलीकडेच निधन झालं!) अखेरपर्यंत त्या पक्षाचं निशाण रोवून एकटेच उभे होते. पण आता जनता पक्षातून फुटल्यानंतर निर्माण झालेला भारतीय जनता पक्ष त्यांच्या गती-अधोगतीतून मार्गक्रमणा करत होता.समाजवादी पक्षाची आणि पुढं जनता पक्षाची इतकी शकलं झाली की, त्याचा हिशेब ठेवणं कठीण होत गेलं. काँग्रेस पक्षही फुटला - तीन-चार वेळा. साहजिकच मूळ पक्षाचे नेतेही बदलत गेले.

एकूणच देशात प्रादेशिक, भाषिक, जातीय आणि धार्मिक संघटनांचा जोर उफाळून आला होता आणि मुंबई-महाराष्ट्रात शिवसेनेचा..अनेक पक्षांचे अध्यक्ष बदलले गेले काही पक्ष विसर्जित झाले फक्त शिवसेना हा एकच पक्ष असा आहे की त्याचे संस्थापक संघटनेच्या जन्मापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत त्या पदावरून हटवले गेले नाहीत कारण त्यांची भूमिका दिवसेंदिवस लोकप्रिय होत गेली आणि हिंदुत्वाच्या मुद्द्याला धार प्राप्त करत मराठी माणसाच्या हक्कासाठी,न्याय न्याय मिळवून देण्यासाठी बाळासाहेब झटत राहिले.. हिंदुत्व या मुद्याबाबतही बाळासाहेबांनी आपले विचार रोखठोकपणे मांडले. बॉंबस्फोट, देशविघातक कृत्ये घडवणार्‍या धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. मतपेटीचे राजकारण करत अशा मुस्लिमांचे लांगुलचालन कोणी करू नये. भारताला आपला देश मानणार्‍या राष्ट्रवादी मुस्लीम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही - असे स्पष्ट विचार त्यांनी शिवसैनिकांसमोर व जनतेसमोर मांडले. या स्पष्ट व रोखठोक भूमिकेमुळेच हिंदुहृदयसम्राट ही त्यांना प्राप्त झालेली उपाधी सार्थ ठरते. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ या घोषणेला खरा अर्थ महाराष्ट्रात प्राप्त झाला तो शिवसेनाप्रमुखांमुळेच. त्यांना हिंदुहृदयसम्राट तसेच सरसेनापती या नावानेही जाणले जाते. म्हणूनच तर बाळासाहेब एकमेव हिंदुहृदयसम्राट ठरले..

१९८४ मध्ये विलेपार्लेतील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत हिंदुत्वाचा खुलेआम पुरस्कार करून हे कार्ड चालू शकते याचा राजकीय संदेश दिला आणि राजकारणातील पक्षाची अस्पृश्यता मिटवून टाकली..गेल्या पाच दशकांत  झालेल्या विविध निवडणुकांत शिवसेनेच्या राजकीय भूमिका रोखठोक आणि स्पष्ट राहिल्या..ठाकरेंचा करारी बाणा शेवटपर्यंत कायम राहिला..

१९८० ते ८५ या काळात बाळासाहेबाना खूप संघर्ष करावा लागला..पण संघर्षाच फलित झालं आणि १९८५मध्ये शिवसेनेन मुंबई महापालिका जिंकली..शिवाजी पार्क वर जल्लोष झाला..बाळासाहेबांची सभा झाली.. तो शिवसेनेचा विजयोत्सवच होता आणि तेव्हा जमशेद कांगा नावाचे एक अत्यंत मवाळ प्रकृतीचे आयएएस अधिकारी महापालिका आयुक्त होते. त्यांचा उल्लेख करून ठाकरे शिवाजी पार्कवर कडाडले होते : ‘आता महापालिकेत शिवसेनेचं राज्य आहे. आयुक्त कांगा यांनी आमच्या नगरसेवकांचं ऐकलं नाही, तर शिवसेनेची भाषा दाखवत खुश्शाल कांगा यांच्या कानाखाली आवाज काढावा..ठाकरे म्हणजे काय चीज आहे, याची पहिली जाणीव प्रशासनाला झाली होती.. प्रशासन कडाडून जाग झालं..सर्वसामान्यांची कामे व्हायला लागली..

शिवसेनेनं मराठी माणसांच्या रोजगाराचा प्रश्न घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात पाऊल ठेवलं. मात्र, नव्वदच्या दशकात शिवसेनेनं भाषा आणि प्रांतवादाच्या सीमा ओलांडत हिंदुत्वाच्या मुद्द्याला जवळ केलं आणि त्यात त्यांना अयोध्या प्रकरणानं बळ दिलं. त्यामुळं सहाजिक अयोध्या प्रकरणाचं शिवसेनेच्या वाटचातीतील महत्त्व अधोरेखित होतंच.. ६ डिसेंबर १९९२ ची सकाळी अयोध्येत देशभरातून तब्बल दीड लाख लोक जमा झाले होते..शिवसेनेनंही मुंबईहून शिवसैनिकांची एक तुकडी अयोध्येत पाठवली होती.. ज्यावेळी अयोध्येत बाबरी मशिदीचा ढाचा पाडला गेला,त्यावेळी स्वतःला हिंदुत्वाचा मालक समजणारे मिळेल त्या बिळात जाऊन लपले.. कारसेवकांनी बाबरी मस्जिद नेस्तनाबूत केली. त्या दंगली भडकल्या स्वतःला हिंदूंचे नेते म्हणवणाऱ्या भल्या भल्यांचे परिस्थिती बघुन धाबे दणाणले..त्यानी सरळ सरळ तो मी नव्हेच आशी भूमिका घेऊन बाजूला झाले..त्या वेळी माध्यमांनी बाळासाहेबांच्या भोवती गराडा घातला बाळासाहेबांना विचारले गेले “बाबरी विध्वंस करणारे लोक शिवसैनिक आहेत का ? जर बाळासाहेबांना वाटलं असत तर ते लोक माझे नाहीत म्हणू शकले असते, मात्र ज्या शिवसैनिकांनी आपल्या एका शब्दावर प्राणांची आहुती दिली त्या शिवसैनिकांना एकटे टाकुन देणारा हा नेताच नव्हे..त्यांनी संपुर्णपणे शिवसैनिकांची आणि हिंदुत्ववादी लोकांना साथ दिली..आणि इथेच या नेत्यानी सांगीतले.“हे बाबरी पाडणारे जर माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे.” आणि इथेच बाळासाहेब हिंदूह्र्दय सम्राट बनले..याच वाक्यानं देशभरातील असंख्य हिंदुत्ववादी योध्यांना सुरक्षेचं एक कवच प्राप्त झालं..अन बिळात लपलेले सुरक्षित बाहेर आले.

मुंबई, ठाणे महापालिकांतील शिवसेनेचा शिरकाव व विस्तार, स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमातून या क्षेत्रांत शिवसेनेने मिळवलेली आपुलकी, गिरणी कामगारांचा संप, प्रॅक्टिकल सोशालिझ्मचा प्रयोग आणि पुढे शिवसेनेने १९८९ साली बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षा बरोबर युती केली व १९९५ साली महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचे सरकार अस्तित्वात आले.. शिवसेनेचे मनोहर जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री झाले.. हे महाराष्ट्रातील खर्‍या अर्थाने पहिले बिगर काँग्रेसी सरकार होते. हा सत्तांतराचा चमत्कार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्व व कार्यशैलीमुळेच घडला..शिवसेनेबरोबर युती केल्यामुळे भाजपला महाराष्ट्राच्या सत्तेची चव १९९५ मध्ये चाखायला मिळालीच; शिवाय केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी त्या काळात कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या राज्यातून ‘युती’चे भरघोस खासदारही निवडून आणता आले. महाराष्ट्रातील युतीच्या राजकारणावर बाळासाहेब असेपर्यंत शिवसेनेचाच वरचष्मा होता आणि कोणत्याही वादात बाळासाहेबांचाच शब्द अंतिम ठरत असे. तसेच त्यानंतर केंद्रात १९९९ साली अस्तित्वात आलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये सेनेचे मनोहर जोशी हे लोकसभा अध्यक्ष झाले..याआधी मराठवाड्यातील पहिला राजकीय दौरा होता आणि तेथील लोकही ‘ठाकरे’ ही काय चीज आहे, हे बघायला कमालीचे उत्सुक आणि उतावीळ होते. त्यामुळे जागोजागी प्रचंड गर्दी होत होती. त्या गर्दीची नशा बाळासाहेबांना चढत होती आणि त्यांच्या रसवंतीला बहार येत असे. नकला, विनोद, चुटकुले यांनी त्यांचं भाषण रंगत असे आणि त्या बहरात ते कोणालाच आपल्या तडाख्यातून सोडत नसत..अगदी महात्मा गांधीही त्यातून सुटले नाहीत. टवाळी तर ते सर्वांचीच करत असत आणि समोरच्याची खिल्ली उडवणे, हा तर त्यांचा धर्मच होता. त्यातून शिवसेनेशी युती केलेल्या भारतीय जनता पक्षाचे नेतेही सुटत नसत..

महाराष्ट्रात सत्तेत असतांना पुढे अनेकांनी माती खाल्ली आणि शिवसेनेचं सरकार घालवत काँग्रेस सोबत हातमिळवणी केली..त्याच काळात भुजबळ सारखे बाळासाहेबांनी घडवलेले अनेक दिग्गज बाळासाहेबांना सोडून गेले..तरीही आपल्या संघटनेचं काम अविरतपणे सुरूच राहील.. जातीपातींचे राजकारण, सहकारी संस्था - साखर कारखाने स्थापन करून केलेले सत्ताकारण, कुटिल राजकीय डावपेच असे महाराष्ट्रातील परंपरागत राजकारण बाळासाहेब ठाकरे यांनी केले नाही. तरुणांची मने महाराष्ट्राच्या अभिमानाने भारून टाकणे, जनतेच्या मनातील विचार नेमके ओळखून, त्यांची नाडी ओळखून ते विचार एकमेवाद्वितीय अशा वक्तृत्व शैलीच्या साहाय्याने मांडणे आणि आक्रमक संघटनेच्या माध्यमातून विविध आंदोलने करणे, अशी कार्यपद्धती बाळासाहेबांनी अवलंबिली. मनोहर जोशी, सुधीर जोशी, प्रमोद नवलकर, मधुकर सरपोतदार, छगन भुजबळ, सुरेश प्रभु, आनंद दिघे, दत्ताजी नलावडे,गणेश नाईक असे रस्त्यावर अडगळीला पडलेले असंख्य नेते बाळासाहेबांनी घडविले..उद्धव ठाकरे तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जडणघडणीतही अर्थातच बाळासाहेब ठाकरे यांचाच मोठा वाटा आहे. स्वतः प्रत्यक्ष कोणतेही सत्तापद न भूषविता सत्ताकारणाला योग्य ती दिशा देणे ही राजकारणाची - सत्ताकारणाची पद्धतही खास बाळासाहेबांचीच.. महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप यांच्या युतीच्या हाती राज्याची सत्ता होती. ती १९९९मध्ये गेली आणि त्यानंतरच्या दोन निवडणुकांतही शिवसेनेला पुन्हा मंत्रालयावर कब्जा मिळवता आलेला नाही. मात्र, नेमक्या याच काळात केंद्रात भाजपप्रणीत ‘एनडीए’चं राज्य होतं आणि ते साडेसहा वर्ष टिकलं..शिवसेना अर्थातच या आघाडीतील एक प्रमुख पक्ष होता.. एनडीए च रिमोटच बाळासाहेबांकडे होत..त्यामुळे नंतर राज्यातली सत्ता गेली,तरी केंद्रात मंत्रीपदेच नव्हे,तर थेट लोकसभेचं अध्यक्षपदही शिवसेनेला मिळू शकलं..

या नंतर बाळासाहेबांना जबर धक्का बसला तो उजवा हात समजले जाणारे धर्मवीर आनंद दिघे यांचे निधन..ऑगस्ट २००१ च्या शेवटच्या आठवड्यात शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख
धर्मवीर आनंद दिघे यांच्या गाडीला अपघात झाला.ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र हृदयविकाराच्या तीव्रधक्क्याने त्यांचे निधन झाले. साऱ्या शिवसैनिकांना हा जबरदस्त धक्का होता..शिवसेनाप्रमुखांची पंचाहत्तरी
असंख्य लोकांना प्रेरणा देणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दोन कौटुंबिक अपघातानंतर अनेकदा एकाकी असत. याच दरम्यान २००२ मध्ये त्यांची पंचाहत्तरी आली..यानिमित्त मोठा समारंभ व्हावा ही शिवसैनिकांची इच्छा होती..ती
त्यांनी मान्य करावी यासाठी उद्धवजी ठाकरे,मनोहर जोशी यांनी कळकळीची विनंती केली. तथापि बाळासाहेबांनी होकार दिला नाही.

या नंतर महानगर पालिका निवडणूक आली..मुंबई, ठाणे, नाशिक, सोलापूरमध्ये भगवा मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसला देशातून बरखास्त करा असे जबरदस्त आवाहन हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत २२६ जागांपैकी शिवसेनेला ९८ आणि भाजपाला ३५ जागा मिळून मुंबईवर भगवा फडकला..मुंबई कुणाच्या बापाची नाही..मुंबई आपली आहे आपली आणि इकड आवाजही आपलाच हवा..मुंबईवर अधिकार तो फक्त बाळासाहेबच चालवू शकले अन्य कुणालाही ते जमलं नाही..किंबहुना जमणारही नाही आणि भर सभेत तर त्यांच्याशिवाय एवढं निडर पणे कोणीच बोलू शकल नाही.

शिवसेनेला आता भावी नेतृत्वाची गरज होती..२००३ साली महाबळेश्वर येथे पार पडलेल्या शिबिरात शिवसेनेच्या घटनेत
बदल करून शिवसेनाप्रमुख आणि शिवसेना नेते यांच्यामध्ये एक नवीन पद निर्माण करण्यात आले. हे पद म्हणजे कार्यकारी प्रमुख..शिवसेना नेते उद्धवजी ठाकरे यांची या पदावर एकमताने निवड करण्यात आली..ही शिवसेनेच्या
इतिहासातील ऐतिहासिक घटना होती..

२००४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी
निवडणुकीत शिवसेनेला ६२ जागा मिळाल्या.. १४ एप्रिल २००५ रोजी रंगशारदा सभागृहात शिवसेना पदाधिकाऱ्यांचे
शिबीर होते. शिवसेनाप्रमुख शिबिरात येण्यापूर्वीच नारायण राणेयांनी भाषण केले. त्या भाषणात ते म्हणाले, ‘पैसे घेऊन शिवसेनेत पदे विकत घेतली जात आहेत. पदांचा बाजार भरला आहे.’ त्याच दिवशी सायंकाळी शिवसेनाप्रमुखांनी नारायण राणेंच्या जणु पार्श्वभागावर लाथ देत शिवसेनेतून हकालपट्टी केली..यानंतर राज ठाकरे अस्वस्थ झाले त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत नवी राजकीय वाटचाल सुरु केली.. २००५ च्या अखेरीस शिवसेनेचे नेते राज ठाकरे यांनी शिवसेनेविरुद्ध बंड केले. त्यांनी नेतेपदाचा आणि विद्यार्थी सेनेचा राजीनामा दिला. राज ठाकरेंचे काही समर्थक त्यांच्याबरोबर गेले, मात्र राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडूनही शिवसेना अभेद्यच राहिली..

शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्यांना शिवसैनिक गाडल्याशिवाय राहणार नाहीत,’ असे खणखणीत उद्गार
उद्धवजींनी काढल्यानंतर शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आणि त्याचा परिणाम २००७ मध्ये दिसून आला..२००७ साली झालेली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिवसेनेसाठी
प्रतिष्ठेची होती..केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर साऱ्या देशाचे
लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. अखेर निवडणुकीत
शिवसेना ८३ आणि भाजपा २८ जागी निवडून येऊन युती सत्तेवर आली..ठाण्यामध्येही ४८ जागा मिळून शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष ठरला..उद्धवजी लढाईत जिंकले व तहातही जिंकले..मुंबई आणि ठाणे या दोन्ही ठिकाणी शिवसेनेला सरळ विजय प्राप्त झाला. दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे महापौर निवडून आले..उद्धवजींनी आपल्या बुद्धिचातुर्याने आणि
युक्तीप्रयुक्तीने हे घडवून आणले..बाळासाहेब प्रचंड खुश झाले.. आपण घेतलेला निर्णय योग्य असल्याची ती पहिली खून होती..

२००७ मध्ये पार पडलेली राष्ट्रपतीपदाची निवडणूक फारच गाजली..भाजपा पुरस्कृत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार म्हणून भैरोसिंह शेखावत तर काँग्रेस आघाडीच्या वतीने प्रतिभाताई पाटील निवडणुकीच्या रिंगणात होत्या. भैरोसिंह शेखावत हे भाजपाचे म्हणजेच शिवसेनेच्या मित्रपक्षाचे होते, तर प्रतिभाताई पाटील या काँग्रेसच्या आणि
महाराष्ट्राच्या मराठी होत्या..त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेकडे साऱ्यांचेच लक्ष लागले होते..पण बाळासाहेब म्हणजे उघड भूमिकेचे प्रणेते होते..शिवसेनेने उघडउघड प्रतिभाताई पाटील यांना मराठी माणूस म्हणून आणि महाराष्ट्राची महिला म्हणून पाठिंबा जाहीर केला...या निवडणुकीत प्रतिभाताई पाटील विजयी होऊन पहिल्या महिला राष्ट्रपती ठरल्या...इथे महाराष्ट्र्पती आणि मराठी माणसाप्रति बाळासाहेबांचं प्रेम अधोरेखित झालं..सगळ्या मराठी माणसाच्या घरात बाळासाहेबांचा आदर अजून वाढला..

२००९ साली झालेल्या लोकसभा निवडणुका चुरशीच्या झाल्या.शिवसेना कार्यप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि अन्य शिवसेना नेते यांनी निवडणूक प्रचार काळात महाराष्ट्र पिंजून काढला. शिवसेना-भाजपा युतीचे २० खासदार निवडून आले..विशेष म्हणजे भाजपापेक्षा शिवसेना कमी जागा लढवत असूनही शिवसेनेने भाजपापेक्षा दोन जागा जास्त जिंकल्या..शिवसेनेचे ११ तर भाजपाचे ९ खासदार निवडून आले..उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाचेच हे यश असल्याचे मानले गेले.

२०१० साली झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांनी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर युवासेनेची स्थापना करून युवासेना प्रमुख म्हणून आदित्य ठाकरे यांची नियुक्ती केली. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवासेना म्हणजेच महाराष्ट्रातील तरुणांचे समर्थ व्यासपीठ अशी युवासेनेची ओळख बनली.. युवावर्गाचे प्रश्न, त्यांची मत-मतांतरे, त्यांच्या
अडचणी आणि समस्या मांडण्याचे युवासेना हे हक्काचे
व्यासपीठ ठरले..मुंबई विद्यापीठ सिनेटमध्ये दणदणीत विजय
२०१० मध्ये मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेचे
अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेने
दणदणीत विजय प्राप्त केला..एखाद्या पॅनेलने १० पैकी आठ
जागा जिंकण्याचा मुंबई विद्यापीठाच्या इतिहासातील हा विक्रमच ठरला..बाळासाहेब इथे आदित्यजींवर प्रचंड खुश झाले..बाळासाहेबांना भविष्यातील युवा महाराष्ट्र आदित्य पर्वाची नांदी तिथेच दिसली..

महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त २०१० मध्ये शिवसेनेने आयोजित केलेल्या रक्तदानाच्या महायज्ञाने विक्रमाला गवसणी घालत २५ हजार ६३ रक्तबाटल्यांचा विक्रम गाठला आणि या महायज्ञाची नोंद थेट "गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये केली..श्री उद्धवजी ठाकरे यांनी स्वतः रक्तदान करून शिवसेनेच्या रक्तदान महायज्ञाचा शुभारंभ केला.महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी ज्या हुतात्म्यांनी आपले
रक्त सांडले, त्या हुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ न देता शिवसेनेने महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात महारक्तदानाचा संकल्प पूर्ण केल्याचे उद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले.. रक्तदानास सकाळी ६ वाजल्यापासून रक्तदात्यांनी रांगा लावण्यास सुरुवात केली होती..अतिशय नियोजन पद्धतीने व अत्याधुनिक प्रकारे आयोजित केलेल्या रक्तदान महायज्ञासाठी रक्तदात्यांचा ओघ वाढतच होता.. रक्तदान महायज्ञासाठी मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे,औरंगाबाद, नगर, धुळे, नंदुरबार आदी ठिकाणच्या ८२ रक्तपेढ्यांमधील ६०० डॉक्टार्स, ८०० तंत्रज्ञ सहभागी झाले होते.."गिनीज बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये नोंद करून रक्तसंकलनाचा विक्रम केल्याबद्दल न्यूयॉर्कच्या “गिनीज बुक’च्या प्रतिनिधी सॅरा बुलक यांनी श्री उद्धवसाहेब ठाकरे यांना प्रमाणपत्र बहाल केले.. रक्तसंकलनाचा विक्रम आजही शिवसेनेच्याच नावावर कायम आहे..

प्रखर हिंदुत्वाचा झंजावात आणि मराठी मनाचा मानबिंदू असणारी शिवसेना बाळासाहेबांच्या नेतृत्वात अखंड आगेकूच करीत जनसामान्यांच्या मनात आपले स्थान कायम राखून प्रवास करत होती..पण याच बरोबर बाळासाहेबांचं वय झालं होत..२०१२ च्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी मातोश्रीवरूनच शिवसैनिकांना विचारांचं सोनं दिल पण यावेळी एक आवाहनही केलं जस मला सांभाळलं तस उद्धव ला सांभाळा आदित्यला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून घ्या..या नंतर बाळासाहेब आजारी पडले..दिवाळी तोंडावरच होती अशातच साहेबांची तब्यत अधिक खराब झाली..

अखेर १७ नोव्हेंबर २०१२ रोजी बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्याची बातमी आली अन काळजाचा ठोका चुकला.. या महान नेत्याने मराठी माणसाला अखेरचा जय महाराष्ट्र केला, काळ थांबला, युगांत झाला, अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडून गेला.. देशभर दंगली उसळ्या असतांना मुंबईसह महाराष्ट्राला सुरक्षित ठेवणारा रुद्राक्षधारी हात स्तब्ध झाला..महाराष्ट्रातील ठीक ठिकाणी सुरु असलेला यज्ञ थांबला..महाराष्ट्रातील राजकारणाचं एक भारलेलं आणि भडकलेलं, न्याय हक्कासाठी बहकलेलं आणि बेधडक पर्व संपलं.. महाराष्ट्राची बुलंद तोफ थंड झाली.. शतकांच्या यज्ञातून उठलेली एक केशरी ज्वाला विझली..मराठी माणसाचा आणि दिल्लीच्या खुर्चीला हादरे देणारा बलाढ्य आणि बुलंद वाघ हरपला.. महाराष्ट्राच्या वाघाचं जाण्यानं हिंदुस्थानच्या राजकीय पटलावरचा झंझावात विसावला अन हिंदूत्वाची धगधगती तोफ शिवतीर्थावरच्या गडावर थंडावली.. ज्या ठिकाणावरून बुलंद तोफ सुरु झाली अन देशाला नव्हे तर जगाला ठणकावून सांगत आपल्या आवाजाने पाकड्यांना वठणीवर आणणारा आवाज त्याच शिवतीर्थाच्या  कुशीतच विसावला..

अनेक नेते येतात आणि जातात..निवडणूक, प्रचार, पद, पैसा आणि शेवटी एखादा पुतळा एवढ्यावरच बहुतेक राजकारण्यांचे राजकारण संपून जाते..पण लोकांच्या हितासाठी जिवाच्या आकांताने लढणारा योद्धा मात्र कधीच संपत नाही..शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे असेच योद्धे होते..बाळासाहेबांच्या आवाजाशिवाय न थांबणारी मुंबई साहेबांचा आवाज पुन्हा ऐकायला मिळणार नसल्याचं दुःख ऐकून कधी न थांबणारी मुंबई थांबली..शिवसेना पोरकी झाली..प्रत्येक शिवसैनिकांच्या घरात सुतक पडलं..साहेबांवर प्रेम करणारी माय माउली धाय मोकलुन रडली.. एक ना भूतो ना भविष्यती पर्व संपलं..

मग साहजिक प्रश्न पडला पुढे शिवसेनेचा वाली कोण ?

बाळासाहेबांनंतर शिवसेनेचं भवितव्य काय ?? उद्धव ठाकरे शिवधनुष्य पेलू शकले का ?? बाळासाहेबांच्या निधनानंतरची शिवसेनेची वाटचाल कशी चालू आहे ?? हे भाग २ मध्ये उद्या प्रसिद्ध केले जाईल..

#लेखन - शिवसैनिक_वैभव_शिंदे.
( बाळासाहेबांचा शेवटचा काळ लिहितांना डोळे भरून आले.. शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेचा इतिहास सर्वांना कळावा या हेतून लेख लिहिला गेला आहे..)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या