💥सोलापूर प्रशासनाच्या हेकेखोरपणामुळे अखेर हेलीकॉप्टर वारी रद्द...!


💥प्रशासकीय कोडगेपणा संतापजनक - गोविंद यादव 

गंगाखेड (दि.३० जुन) : गंगाखेडच्या संत जनाबाई आणि संत मोतीराम महाराज यांच्या पादुकांची हेलीकॉप्टर पंढरपूर वारी अखेर रद्द झाली आहे. परभणी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक परवानगी नंतरही सोलापूर जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या हेकेखोर कठोर भूमिकेमुळे ही वारी होवू शकली नाही. प्रशासनाचा हा कोडगेपणा अतीषय संतापजनक असल्याची प्रतिक्रिया या हेलीकॉप्टर वारीचे संयोजक गोविंद यादव यांनी व्यक्त केली आहे.  

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरची आषाढी यात्रा रद्द करण्यात आली आहे. पण मानाच्या नऊ पालख्यांना मात्र सशर्त परवानगी देण्यात आली. याच धर्तीवर गंगाखेडच्या संत जनाबाई आणि संत मोतीराम महाराज यांच्या पादुका हेलीकॉप्टरद्वारे पंढरपूरला नेवू देण्याची मागणी गंगाखेड तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष गोविंद यादव, संत जनाबाई पालखीचे मानकरी शिवाजी चौधरी, मनोहर महाराज केंद्रे, फळा संस्थानचे अध्यक्ष गिरीधारीसेठ काकाणी यांच्या वतीने करण्यात आली होती. यासाठी लागणारा खर्च लोकवर्गणीतून करून आवश्यक ती संपुर्ण काळजी घेण्याबाबतही प्रशासनास कळवण्यात आले होते.

परभणीचे जिल्हाधिकारी डॉ दिपक मुगळीकर यांनी ही मागणी सकारात्मक घेत गंगाखेड आणि फळा येथे हेलीपॅड ऊभारणीसंदर्भाने प्रशासकीय तयारीही सुरू केली होती. हेलीकॉप्टरसाठी लागणारा निधी देण्याची तयारी संतोष मुरकुटे यांनी दाखवल्यानंतर पुणे येथील ॲरोट्रान्स कंपनीचे हेलीकॉप्टरही आरक्षीत करण्यात आले होते. या तयारीच्या अनुषंगाने सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे पंढरपूर येथे हेलीकॉप्टर लॅंडींगची रीतसर मागणी करण्यात आली. ती नाकारत परभणी जिल्हाधिकाऱ्यांनाही अशी परवानगी न देण्याबाबत सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी कळवले. यावरून परभणी जिल्हाधिकाऱ्यांनीही हेलीकॉप्टर परवाना रद्द करण्यात येत असल्याचे गोविंद यादव यांना कळवले. यानंतरही पुणे विभागाचे विभागीय आयुक्त डॉ दिपक म्हैसेकर यांची यादव यांनी पुणे येथे जावून प्रत्यक्ष भेट घेत संपुर्ण परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला. तसेच कोरोना संदर्भाने आवश्यक ती संपुर्ण काळजी घेण्याचे लेखी निवेदन दिले. तथापी नऊ पालख्यांव्यतीरीक्त ईतर कोणासही पंढरपूरात प्रवेश देता येणार नाही, अशी कठोर भुमिका घेत विभागीय आयुक्तांनी ही परवानगी नाकारली. यामुळे परभणी जिल्ह्यातील संत जनाबाई आणि मोतीराम महाराज भक्त गणांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे.

संतापजनक आणि निषेधार्ह - गोविंद यादव
सोलापूर जिल्हाधिकारी प्रशासनाचा हा निर्णय संतापजनक आणि निषेधार्ह असल्याची प्रतिक्रिया हेलीकॉप्टर वारीचे संयोजक गोविंद यादव यांनी व्यक्त केली आहे. प्रशासन घालील त्या अटी आणि शर्ती आम्ही मान्य करत होतो. खर्चही प्रशासनाला करायचा नव्हता. तसेच या वारीतून कोरोनाचा कसलाही संसर्ग वाढण्याची शक्यता शुन्य टक्का होती. असे असतानाही ही परवानगी नाकारण्यामागे सोलापूर जिल्हा प्रशासनाची हेकेखोर वृत्ती हेच कारण असू शकते, असे यादव म्हणाले. आज परभणीचे जिल्हाधिकारी डॉ दिपक मुगळीकर यांची ह. भ. प अच्युत महाराज दस्तापूरकर यांचेसह आम्ही भेट घेतली. आजही जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे विभागीय आयुक्तांशी दुरध्वनीवरून संवाद साधला. परंतू विभागीय आयुक्तांनी आपली नकारघंटा कायम ठेवत या दोन्ही पादुकांना पंढरपूर प्रवेश नाकारला. तरीही, अजूनही आपले मुख्यमंत्री स्तरावरून परवानगी मिळवण्याचे प्रयत्न सुरूच असल्याची माहीती यादव यांनी दिली आहे. आज रात्रभरातून अथवा ऊद्या दिवसभरात जरी परवानगी मिळाली तर बाकी सर्व यंत्रणा सज्ज असल्याने पादुका दोन तासांत पंढरपूरात पोहोचतील, असा विश्वास गोविंद यादव यांनी व्यक्त केला आहे. यावेळी मनोहर महाराज केंद्रे, माजी नगरसेवक प्रविण काबरा, माऊली ढेंबरे, प्रमोद साळवे आदिंची ऊपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या