💥ते उपाशी झोपत असतील... तर आपल्याला झोप येईल का....? 💥नांदेड येथील कमल फाऊंडेशनचे भावनिक आवाहन "आम्ही त्यांना समजून घेतोय... तुम्ही आम्हाला समजून घ्या"💥  
       
नमस्कार नांदेडकरांना....

आमची जेवढी ताकत होती तेवढी पूर्ण पणाला लावून गेल्या 66 दिवसापासून धान्य, किराणा आणि अन्नाचं वाटप सुरू आहे. जवळ होतं नव्हतं सगळं पणाला लावलंय... पण तरी बरच करायचं बाकी राहिल्याची खंत बैचेन करत आहे. कुणी तीन तीन दिवस नुसतं पाण्यावर काढत असेल तर यापेक्षा वाईट काय असणार आहे या जगात...!  झोपडीत राहणारी ती बाई "भाऊ,दोन लेकरं हाईत घरी... खायला काय नाही जरा जास्त देता का..?" असं म्हणताना किती हतबल दिसत होती. राशन कार्डवर नाव नसलेले भिक्षुक लोक "चूल पेटत नाही ओ भाऊ... लोकं काम देत नाहीत, राशन मिळत नाही ... तुम्हीच सांगा काय करू..!" असं म्हणून त्यांच्या केविलवाण्या लेकरांना आमच्या समोर घेऊन आल्यानंतर आम्ही स्वस्थ कसे बसणार..?  पालावरच्या वस्तीत शहरातील वेगवेगळ्या भागातील, झोपड्यासाठी एक महिन्याचा किराणा व राशन वाटप करू आल्यानंतर असे अनेक अस्वस्थ प्रश्न घेऊन आम्ही बैचेन झालो होतो.

                 आमच्या पगारातून आणि काही मित्रांच्या मदतीतून आजपर्यंत झेपेल तेवढी जबाबदारी पेलण्याचा प्रयत्न करत आहोत. अनेक लोक हक्कानं गाऱ्हाणे सांगत आहेत. आम्ही प्रशासन नाही... ना उद्योजक... ना श्रीमंत व्यापारी..! तरीही या महामारीत भूकमारी सोबत आमचा संघर्ष सुरुच आहे..! या लॉक डॉउनच्या परिस्थितीमध्ये आम्ही मात्र वाड्या वस्त्यांवर ,रेल्वे स्टेशन परीसर,बसस्थानक, बंदाघांट परिसर,तसेच ईतर विविध ठिकाणच्या प्रवासी, निराधार, मनोरुग्ण, दिव्यांग, यांच्या कडे जातोय, झोपडपट्ट्यात जाऊन लोकांना सांगतोय, जी शक्य असेल ती मदत करतोय. आमच्या प्रत्येकाच्या घरचे तणावात असतात... आम्हाला काही होणार तर नाही ना..! या चिंतेने हे काम बंद करावं म्हणून त्रासिक विनवण्या करतात... अनेकदा घरगुती खटके उडतात... अनेकदा त्यांचं पटतही... पण कुठून तरी फोन येतो... जो अशा कठीण काळात घरी बसण्याला परवानगी देत नाही... लोकाना गरज असताना आपण स्वतःमध्ये असं गुरफटून राहणं मनाला पटत नाही... आणि सुरू होते ऊन, वाऱ्यातली मोहीम... सकाळी सुरू झालेली ही मोहीम चालत राहते सूर्य आडोश्याला जाईपर्यंत..!

        आमचा उत्साह कमी होणार नाही... पण ताकत कमी झालीय..! अशा प्रत्येक माणसाला अन्न पोहचवण्यासाठी आम्ही वाटेल तो संघर्ष करू... पण आमच्या जवळ भूकमारी सोबत लढण्यासाठी लागणारी रसद संपलीय... जे करता येईल ते केल ...! आता तुमच्या मदतीची अपेक्षा आहे..! तुम्ही आम्हाला मदत केली.. तर आम्ही त्यांना मदत करु... जे वाट पाहतायेत माणुसकीचा दोन घासासाठी...!

आम्ही त्यांना समजून घेतोय... तुम्ही आम्हाला समजून घ्या..!


अमरदिप गोधने.बुध्दभुषण सोनसळे.
महेश गुपीले.घनश्याम जाधव.
सुनील शिंदे.विक्की जैन.
पवन सरोदे.बालाप्रसाद राठोड.
अनिल ढेंबरे.साई कदम.
कमल फाऊंडेशन नांदेड.(NGO).
मो.नं.9822677306

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या