💥अत्यंत धक्कादायक; बीड जिल्ह्यात कोरोनाचे आठ नवे रुग्ण...!‌💥जिल्ह्यातील गेवराई,माजलगाव पाठोपाठ बीड आणि केज तालुक्यातही कोरोनाचा शिरकाव💥

बीड : जिल्ह्यात कोरोना हळूहळू हातपाय पसरू लागल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी बीड जिल्ह्यातून ६६ संशयितांचे स्वॅब‌ तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी आठ जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले असून ५५ जणांचे निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित तिघांचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे. गेवराई, माजलगाव पाठोपाठ बीड आणि केज तालुक्यातही कोरोनाने शिरकाव केल्याचे आजच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे हे सर्व रुग्ण मुंबई आणि ठाणे शहरातून बीड जिल्ह्यात आलेले आहेत.

आज पाॅझिटीव्ह आलेल्या रुग्णांपैकी सहा जणांचे स्वॅब बीडच्या तर दोन जणांचे केजच्या रुग्णालयातून पाठविण्यात आले होते. यापूर्वी मुंबई येथून आलेल्या गेवराई तालुक्यातील इटकुर येथील १२ वर्षीय मुलीला कोरोनाची बाधा झाली होती. तिच्या आईचाही (वय ३५) अहवाल आज पाॅझिटीव्ह आला. बीड शहरातील पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात मोमीनपुरा येथील दोन तरुण (वय २२ आणि २४ वर्षे) आणि सावता माळी चौकातील तिघे (वय १४, १६ आणि ३६ वर्षे) यांचा समावेश आहे. हे पाचही जण ठाण्याहून बीडला आले होते. केज तालुक्यातील दोघांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले असून त्यात चंदन सावरगाव आणि केळगाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश असून ते दोघे मुंबईहून परतले होते.

यापूर्वी बीड जिल्ह्यात कोरोनाचे १२ रुग्ण सापडले होते. त्यापैकी एक उपचारानंतर बरा झाला, तर एका वृद्धेचा मृत्यू झाला. त्यानंतर सहा जणांना पुण्याला हलविण्यात आले होते आणि उर्वरित चौघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. आज आठ जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आल्यानंतर जिल्ह्यात उपचार सुरु असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या एकूण १२ झाली आहे. आजवर बीड जिल्ह्यात सापडलेले सर्वच्या सर्व २० कोरोनाबाधित परजिल्ह्यातून आलेले आहेत..,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या