💥राज्यातील शाळांच्या परीक्षा रद्द झाल्या,तरीही विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळणार...!💥विद्यार्थ्यांचे पूर्वीचे मुल्यमापन करुन त्यांची गुणपत्रिका बनविण्यात येणार असल्याची माहिती💥

जगभरात कोरोना संसर्गाचा वाढता प्रभाव लक्षात घेता देशात ‘लॉकडाऊन’ घोषित करण्यात आला. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचा प्रभाव शिक्षण क्षेत्रावरदेखील दिसून येत आहे. शाळा, महाविद्यालये यांसह अन्य शिक्षण संस्थांचे कामकाज २४ मार्चपासून बंद पडले आहे. राज्यातील सर्वच शाळा  बंद झाल्या असून शाळांमध्ये परीक्षाही घेण्यात आल्या नाही.  महानगरपालिकेच्याही शाळांचा यामध्ये समावेश आहे. आता, विद्यार्थ्यांचे पूर्वीचे मुल्यमापन करुन त्यांची गुणपत्रिका बनविण्यात येणार असल्याची माहिती आहे.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा होत असतात. परंतु, कोरोना संसर्गामुळे शाळा बंद झाल्या असून, पुढील सर्व कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे यावर्षीची वार्षिक परीक्षा अखेर रद्द करण्यात आली. स्थानिक पातळीवर शिक्षण समितीमार्फत या परीक्षा घेतल्या जात असतात. पूर्व नियोजनानुसार सहामाही परीक्षा पार पडली; परंतु वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक कोलमडले. देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन आहे. त्यानंतरसुद्धा परिस्थिती कशी असेल याचा अंदाज नाही. त्यामुळे, शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते नववी आणि ११ वीच्या विद्यार्थ्यांना मागील परीक्षांचे मुल्यमापन करुन गुण दिले जाणार आहेत. त्यामुळे शाळांनी गुणपत्रिकेचे काम हाती घेऊन, ऑनलाईन गुणपत्रिका वितरीत कराव्यात अशा सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात येणार आहेत. या गुणपत्रिकेच्या आधारावर विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण विभागातील महत्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
शिक्षण विभागाच्या नियमानुसार वर्षभर विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण सर्वांकष मूल्यमापन करण्यात येते. विद्यार्थ्याची मानसिकता, कल, रुची, आवड, आकलन, विषयातील ज्ञान, आदी गोष्टी विचारात घेऊन सर्वांकष मूल्यमापन केले जाते. त्यामध्ये टक्केवारी ठरविली जात नाही, तर अ, ब, क अशी श्रेणी निश्चित केली जाते. आता परीक्षा रद्द केल्यामुळे ही सातत्यपूर्ण सर्वांकष मूल्यमापन पद्धत स्वीकारून विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका तयार करण्यात येणार आहे. सर्व शाळेतील शिक्षकांनी  १० मे पूर्वी विद्यार्थ्यांचे निकाल द्यायचे आहेत, अशी माहिती आहे.

दरम्यान, कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीकडील शाळेत होणारी वार्षिक परीक्षा रद्द करण्यात आली असून, सातत्यपूर्ण सर्वांकष मूल्यमापनावर आधारित विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाणार आहे. विद्यार्थ्यांचा श्रेणीनिहाय निकाल व गुणपत्रिका दि. १० मे पर्यंत देण्याच्या सूचना प्रशासनाकडून सर्व शाळांना दिल्या आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या