💥कोरोना’संदर्भातील नियम मोडणाऱ्यांना तुरुंगाची हवा खावी लागेल,अजित पवारांचा इशारा...!💥कोरोना’ संसर्गानं ‘हॉस्पिटल क्वारंटाइन’ होण्यापेक्षा नागरिकांनी स्वेच्छेनं ‘होम क्वारंटाईन’ व्हावं,💥


‘कोरोना’पासून बचावासाठी ‘होम क्वारंटाइन’ किंवा ‘हॉस्पिटल क्वारंटाइन्’ हे दोनच पर्याय आज उपलब्ध आहेत. ‘कोरोना’ संसर्गानं ‘हॉस्पिटल क्वारंटाइन’ होण्यापेक्षा नागरिकांनी स्वेच्छेनं ‘होम क्वारंटाईन’ व्हावं, स्वत:चं आणि कुटुंबाचं संरक्षण करावं, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

 जे आज घरात थांबणार नाहीत ते काही दिवसांनी हॉस्पिटलमध्ये दिसतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. ‘कोरोना’बाबत काहींच्या बेजबाबदारपणामुळे रुग्णसंख्या वाढतेय, भाजी बाजारातल्या गर्दीमुळे ‘कोरोना’ तुमच्या घरात पोहोचण्याचा धोका निर्माण झाला आहे. गावगुंडांकडून पोलिसांवर हल्ले होत आहेत. या समाजविघातक घटनांची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. ‘कोरोना’संदर्भातील नियम मोडणाऱ्यांना तुरुंगाची हवा खावी लागेल, त्याची सुरुवात काल झाली आहे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

राज्य शासनाने आवाहन केल्यानंतर अनेक खासगी डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने, हॉस्पिटल सुरू केले आहेत, परंतु ज्यांनी त्यांचे दवाखाने अजूनही सुरू केलेले नाहीत, त्यांची नोंद राज्य शासनाने आणि स्थानिक नागरिकांनी घेतली आहे. या डॉक्टरांवर निश्चित कारवाई केली जाईल, असेही उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितले.

राज्यात अन्नधान्याचा, खाद्यतेलाचा, दूध, भाजीपाल्याचा, औषधांचा, इंधनाचा मुबलक साठा आहे. या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कधीही बंद पडणार नाही. त्यामुळे खरेदीसाठी गर्दी करू नये. दिल्लीतील ‘मरकज’ घटनेपासून धडा घेऊन यापुढे कुठलाही सामुदायिक मेळावा आयोजित करू नये, त्याला परवानगी दिली जाणार नाही, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आज राज्यात रामनवमी भक्तिभावानं, साधेपणाने साजरी केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी  जनतेचे आभार मानले आहेत. यापुढेही सर्व सण, उत्सव साधेपणानं साजरे व्हावेत, असं आवाहनही त्यांनी केलं आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या