💥परळीत सापडलेल्या 'नकोशी' चे सुप्रियाताई सुळे व धनंजय मुंडे यांनी स्वीकारले पालकत्व...!


💥काटेरी झुडपात सापडलेल्या मुलीचे 'शिवकन्या' असे केले नामकरण💥

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- (दि. २४)   परळी शहरात रात्री ८ च्या सुमारास नुकत्याच जन्मलेल्या स्त्री जातीच्या अर्भकाला रेल्वे पटरीजवळ काटेरी झुडुपात टाकून दिल्याचा धक्कादायक व संतापजन प्रकार समोर आल्यानंतर परळीचे आमदार तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी या मुलीचे पालकत्व स्वीकारले आहे. घडलेल्या प्रकारावर संताप व्यक्त करतच ना. मुंडे यांनी खा. सुप्रियाताई  सुळे यांच्या मदतीने या मुलीचे पालकत्व स्वीकारत, महाशिवरात्री महोत्सवादरम्यान हा प्रकार घडला असल्याने या नवजात मुलीचे 'शिवकन्या' असे नामकरण केले आहे.

सदरील स्त्री जातीचे नवजात अर्भक काटेरी झुडपात टाकण्यात आले असल्याचे समजते, रात्री ८ च्या सुमारास मुलीच्या रडण्याचा आवाज परिसरातील नागरिकांनी ऐकल्यानंतर हा प्रकार समोर आला. हा निर्दयी प्रकार नेमका कोणी केला हे अजून समजू शकले नाही; मात्र या प्रकाराची माहिती मिळताच परळी शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणाचा पोलिस तपास घेत असून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी या बाबीची तात्काळ दखल घेत या मुलीचे पालकत्व स्वीकारून पुढील उपचाराची सोय केली आहे.

ना. मुंडे यांच्या वतीने जि. प. गटनेते अजय मुंडे व डॉ. संतोष मुंडे तसेच गटनेते वाल्मिक अण्णा कराड हे परळी उपजिल्हा रुग्णालयात हजर असून पुढील परिस्थिती हाताळत आहेत. या नवजात 'शिवकन्येला' जीवदान मिळावे म्हणून डॉक्टर सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

हा प्रकार ऐकताच आपले मन खिन्न झाले असून सदर मुलीची मी व खा. सुप्रियाताई पूर्ण जबाबदारी घेत आहोत. तिची तब्येत सुरळीत होताच तिला पुण्यातील सर्व सोयीयुक्त बालकाश्रमात हलवण्यात येईल, तसेच पुढील संगोपन, शिक्षण ते अगदी लग्नासहित या बालिकेची सम्पूर्ण जबाबदारी आमची असेल असे ना. धनंजय मुंडे यांनी कळविले आहे

  या घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यातील संवेदनशीलतेचा प्रत्यय आला आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या