💥मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोरच शिवसेना आमदारांचं नाराजीनाट्य...!💥अजीतन्युज हेडलाईन्स - महत्वाच्या ५ विशेष बातम्या💥  

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकणच्या दौऱ्यावर आहेत. मात्र या दौऱ्यादरम्यान मंत्रिपद न मिळाल्याने शिवसेना आमदार भास्कर जाधव यांची नाराजी पुन्हा समोर आली. गणपतीपुळे येथील विकास आराखड्याच्या भूमीपूजन उद्धव ठाकरेंच्या हस्ते पार पडलं. याच कार्यक्रमात चक्क व्यासपीठावर भास्कर जाधव यांची नाराजी उघड उघड पाहायला मिळाली.या व्यासपीठावर ज्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचासत्कार करण्यात येत होता त्यावेळी त्यांनी उपस्थित शिवसेना नेत्यांना एका फोटोत येण्याची विनंती केली. त्यावेळी खासदार विनायक राऊत यांनी शिवसेना आमदार भास्कर जाधव यांना फोटोत येण्यासाठी आवाज दिला. मात्र भास्कर जाधवांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. या व्यासपीठावर मंत्री उदय सामंत, सुभाष देसाई यांच्यासह मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते. विनायक राऊतांनी स्वत: भास्कर जाधव यांना हात पकडून फोटोत येण्याची विनंती केली त्यावेळी राऊतांचा हात झटकत भास्कर जाधवांनी तोंड फिरवलं. हा सर्व प्रकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या समोरच घडला, त्यात प्रसारमाध्यमांच्या कॅमेरातही ही बाब कैद झाली. त्यामुळे उद्धव ठाकरे घडलेल्या प्रकारावर काय निर्णय घेतात हे पाहणं गरजेचे आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर असताना या दौऱ्यात महाविकास आघाडीतील नेते मंडळींही उपस्थित राहतील अशी शक्यता होती. मात्र उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी रत्नागिरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित राहणार नाही,राज्यात जशी महाविकास आघाडी झाली तशी रत्नागिरीत झालेली नाही. येथे शिवसेनेकडून केवळ आघाडीचा दिखावा केला जात आहे. त्यामुळे अशी महाविकास आघाडी काय कामाची? त्यामुळेच या दौऱ्यावेळी अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतल्याचं राष्ट्रवादीचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले होते.उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचा आम्ही नेहमीच सन्मान करू. मात्र, केवळ दिखावा करण्यासाठी गणपतीपुळे येथे मुळीच जाणार नाही. नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी एकही विकासकाम राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या प्रभागात केलेले नाही. शहरातील सर्व कामे ही शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागात होत आहेत. समतोल विकासाला साळवी यांनी तिलांजली दिली आहे. त्यामुळेच ही खोटी आघाडी मान्य नाही असा टोला राष्ट्रवादीचे सुदेश मयेकर यांनी शिवसेनेला लगावला.

************************************

💥निर्भयाच्या दोषींना आता 3 मार्चला होणार फाशी,डेथ वॉरंट जारी...!


निर्भयाच्या दोषींना आता 3 मार्चला फाशीवर लटकविण्यात येणार आहे. यासंबंधीचे डेथ वॉरंट दिल्लीतील पटियाला हाउस कोर्टाने सोमवारी जारी केले आहे.निर्भयाच्या आई-वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी पटियाला हाउस कोर्टात सुनावणी झाली. यावेळी अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी दिलेल्या आदेशानुसार, या चारही दोषींना येत्या 3 मार्च रोजी सकाळी 6 वाजता फाशी दिली जाणार आहे. सरकारी वकिलांनी सांगितले की, अक्षय, विनय आणि मुकेश या दोषींची दया याचिका कोर्टाने फेटाळून लावली. तसेच, याप्रकरणी दोषी पवन नवी दया याचिका आणि क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करू शकतो. हायकोर्टाने दोषींना सर्व कायदेशीर पर्यायांचा वापर करण्याचा अल्टिमेटम दिला होता, परंतु या कालावधीत दोषी पवनच्यावतीने कोणतीही याचिका दाखल केली गेली नव्हती.

************************************

💥सगळेच रस्ता अडवू लागल्यास कसं चालेल ? शाहीन बाग प्रकरणावरुन सर्वोच्च न्यायालयाचा सवाल...!


सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात शाहीन बागेत गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या मांडल्यानं रस्ते वाहतुकीचे तीन-तेरा वाजले आहेत.या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना आंदोलकांशी संवाद साधण्याच्या सूचना दिल्या. लोकांना आवाज उठवण्याचा अधिकार आहे. मात्र प्रत्येकजण रस्त्यावर उतरु लागल्यास काय होईल, असा प्रश्न न्यायालयानं विचारला.शाहीन बागेतल्या आंदोलनाचा विषय जनजीवन ठप्प करण्याशी संबंधित असल्याचं न्यायालयानं याचिकेवरील सुनावणी दरम्यान म्हटलं. दिल्ली पोलिसांना प्रतिज्ञापत्र देण्याचे आदेश देत न्यायालयानं या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी २४ फेब्रुवारीची तारीख निश्चित केली. न्यायालयानं आंदोलकांशी संवाद साधण्यासाठी वरिष्ठ वकील संजय हेगडे आणि साधना रामचंद्रन यांची नियुक्ती केली. शाहीन बाग परिसरात दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे रस्ता बंद असल्यानं वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे अनेकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत.लोकांना आपला आवाज समाजापर्यंत पोहोचवण्याचा अधिकार आहे. आम्ही त्या अधिकाराच्या विरोधात नाही. लोकशाहीत आवाज उठवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. आंदोलन करण्यासाठी जंतरमंतरचा पर्याय उपलब्ध असल्याचं न्यायालयानं म्हटलं. यावेळी न्यायालयानं आंदोलकांना दिल्लीतल्या वाहतूक कोंडीच्या समस्येकडे देण्याची अप्रत्यक्ष विनंती केली. दिल्लीत वाहतूक कोडींची मोठी समस्या आहे. तुम्हाला याची कल्पना आहे. प्रत्येक जण रस्त्यावर उतरू लागल्यास कसं चालेल?, असा प्रश्न न्यायालयानं विचारला.प्रत्येक व्यक्ती रस्त्यावर आली आणि रस्ता रोखू लागली, तर काय होईल, याची आम्हाला चिंता वाटत असल्याचं न्यायालयानं सुनावणीवेळी म्हटलं. देशातल्या नागरिकांना आवाज उठवण्याचं स्वातंत्र्य आहे. मात्र स्वातंत्र्यासोबतच प्रत्येक नागरिकाची काही कर्तव्यदेखील आहेत. अधिकार आणि कर्तव्यांमध्ये संतुलन ठेवणं गरजेचं आहे, असं मत न्यायालयानं व्यक्त केलं.

*************************************

 💥पाकिस्तानने मागितले भारताकडे मदतीचा हात...!

 जम्मू-काश्मीरमधून कलम ३६० रद्द करण्यात आल्यानंतर वारंवार भारताला लक्ष्य करणारा पाकिस्तान सध्या मेटाकुटीला आला आहे. केंद्र सरकारनं कलम ३७० रद्द करताच पाकिस्ताननं भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडले. मात्र आता पाकिस्तान वाळवंटी टोळांमुळे अडचणीत सापडला आहे. आधीच महागाई गगनाला भिडल्यानं संकटात सापडलेल्या पाकिस्तानची टोळधाडीमुळे दमछाक होत आहे. या समस्येचा सामना करण्यासाठी पाकिस्तान भारताकडून कीटकनाशकं खरेदी करण्याच्या विचारात आहे. भारताविरोधात सातत्यानं विधानं करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्त्वाखाली उद्या कॅबिनेटची बैठक होणार आहे. यामध्ये भारताकडून कीटकनाशकं खरेदी करण्याचा निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता आहे. टोळधाडीनं हैराण झालेल्या पाकिस्तानात राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली आहे. पाकिस्तानमधल्या सिंध प्रांतातल्या पिकांचा फडशा पाडल्यानंतर आता टोळ पंजाब प्रांताकडे सरकले आहेत. टोळधाडीचा सामना करण्यासाठी पाकिस्तानला ७.३ अब्ज पाकिस्तानी रुपयांची आवश्यकता आहे. पाकिस्तानातल्या तब्बल ९ लाख हेक्टर जमिनीवर टोळांची दहशत पाहायला मिळत आहे. टोळधाडीत ४० टक्के पीक नष्ट झाल्याची माहिती सिंध प्रांतातले शेतकरी नेते जाहीद भुरगौरी यांनी सांगितलं. यामध्ये गहू, कापूस, टोमॅटोचा समावेश आहे. यामुळे पाकिस्तानातली महागाई आणखी वाढली आहे. या संकटाशी दोन हात करण्यासाठी आता पाकिस्तान भारताची मदत हवी आहे. टोळधाडींचा फटका राजस्थान, गुजरात आणि पंजाबमधल्या अनेक जिल्ह्यांनादेखील बसला आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही देशांना टोळधाडींचा सामना करावा लागत आहे. या संकटावर मात करण्यासाठी गेल्या दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत पाच बैठका झाल्या आहेत. हे बैठकसत्र पुढेही सुरू राहण्याची शक्यता आहे. येत्या जूनमध्ये देखील मोठ्या प्रमाणात टोळधाड येण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी गुजरात, राजस्थानातल्या काही जिल्ह्यांना टोळधाडीचा फटका बसला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं होतं.

***********************************

💥परळीत मनसे - भाजप नेत्या पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते भिडले...!


परळीत भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक आणि मनसे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. हे कार्यकर्ते भिडल्याचे सांगण्यात येत आहे. मनसे कार्यकर्ते पंकजा मुंडे यांच्या घराकडे जाताना पोलिसांनी रोखले. त्यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. यावेळी पंकजा मुंडे यांचे समर्थक सुद्धा या ठिकाणी जमले आणि त्यांनीही 'पंकजा मुंडे जिंदाबाद' अशा घोषणा दिल्या. यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच परीस्थितीवर नियंत्रण मिळवले.
पंकजा मुंडे यांच्या मातोश्री प्रज्ञा मुंडे या चेअरमन असलेल्या पनगेश्वर शुगर मिल्स साखर कारखाण्याचे मागच्या वर्षाचे वैधानिक किमान मूल्य अर्थात एफआरपी शेतकऱ्यांना मिळाले नाही. त्यासोबतच ऊसतोड मुकादम नाही. त्यांचे पैसे मिळाले नाहीत. म्हणून मनसेने सोमवारी पंकजा मुंडे यांच्या घरासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यासाठी मनसेचे कार्यकर्ते हे परळी शहरातील शिवाजी चौकामध्ये एकत्र झाले होते. यावेळी तणावाचे वातावरण दिसून आले. पंकजा मुंडे यांच्या ‘यशश्री’ या निवसास्थानासमोरच हा सर्व प्रकार घडला. मनसे कार्यकर्ते शिवाजी चौकातून पंकजा मुंडे यांच्या घराकडे जाताना पोलिसांनी त्यांना अडवले. त्यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच बैठक मारली. यावेळी पंकजा मुंडे यांचे समर्थक सुद्धा या ठिकाणी जमले आणि त्यांनीही 'पंकजा मुंडे जिंदाबाद'च्या घोषणा देण्यास सुरुवात केले. त्यानंत मनसे कार्यकर्तेही आक्रमक झालेत. यामुळे काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच परीस्थितीवर नियंत्रण मिळवले.भाजप आणि मनसे कार्यकर्त्यांच्या दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. तर काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या