💥कौशल्य विकासचे अभ्यासक्रम योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी...!



💥अश्या सुचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या💥

मुंबई, दि. १२ : कौशल्य विकास विभागाकडून चालविले जाणारे आयटीआय, विविध इंटर्नशिप कार्यक्रम यांमध्ये मोठी क्षमता असून राज्यातील बेरोजगारी संपविण्याच्या दृष्टीने हा विभाग महत्वाची भूमिका बजावू शकतो. या विभागाचे विविध अभ्यासक्रम, योजना यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांनी आज दिल्या.

अध्यक्ष श्री. पटोले यांनी आज या विभागासंदर्भात बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिपेंद्रसिंह कुशवाह आदी वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

विभागामार्फत राज्यात ४१७ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) चालविल्या जातात. या आयटीआयचे आता वर्ल्ड क्लास आयटीआयमध्ये रुपांतरण करण्याचे काम कौशल्य विकास विभागाने हाती घेतले असल्याची माहिती मंत्री श्री. नवाब मलिक यांनी यावेळी दिली. आयटीआयमधील अभ्यासक्रमांमध्येही कालानुरुप सुधारणा करण्यात येत असून साधनसामुग्री, इमारती यांचाही नजिकच्या काळात कायापालट केला जाईल, असे त्यांनी सांगितले. या उपक्रमाचे अध्यक्ष श्री. पटोले यांनी कौतूक केले. भुवनेश्वर (ओरीसा) येथे आयटीआयमध्ये मोठ्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. तेथील आयटीआयचाही अभ्यास करण्यात यावा, अशा सूचना त्यांनी यावेळी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

*भंडारा जिल्ह्यातील आयटीआयचा होणार कायापालट*

आयटीआयचे वर्ल्ड क्लास संस्थांमध्ये रुपांतरण करण्याच्या कार्यक्रमात भंडारा जिल्ह्यातील सर्व आठ शासकीय आयटीआयचा समावेश करण्यात यावा, अशा सूचना अध्यक्ष श्री. पटोले यांनी यावेळी दिल्या. लाखणी, साकोली, लाखांदूर यांसह जिल्ह्यातील आठही आयटीआयचा जागतिक दर्जा राखून विकास करण्यास यावेळी विभागामार्फत संमती दर्शविण्यात आली. त्यानुसार या आयटीआयमध्ये अत्याधुनिक सुविधा, साहित्य, उपकरणे, दर्जेदार इमारत आणि अभ्यासक्रमांमध्ये कालानुरुप सुधारणा केल्या जातील, असे कौशल्य विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या