💥औरंगाबादमधील शिवसेना भवनात चोरी; लाखोंचे साहित्य, कागदपत्रे पळविले...!


💥शिवाई सेवा ट्रस्टच्या कार्यालयातील १ लाख ६ हजार रुपयांच्या साहित्यावर हात साफ केल्याची घटना उघडकीस💥

 औरंगपुरा येथे उभारलेल्या; परंतु अद्याप सुरू न झालेल्या शिवसेना भवनाचा कडी कोंडा तोडून चोरट्यांनी शिवाई सेवा ट्रस्टच्या कार्यालयातील १ लाख ६ हजार रुपयांच्या साहित्यावर हात साफ केल्याची घटना उघडकीस आली. या चोरी प्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.डॉ. मोहन दिनकर जोशी (रा. कलाश्री अपार्टमेंट, समर्थनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून क्रांतीचौक पोलीस ठाण्याचे पथक सोमवारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सदरील ठिकाणी पाहणी केली असता चोरी झाल्याचे त्यांना आढळून आले. कार्यालयातील साहित्य ओरबडून चोरट्यांनी नेल्याचे दिसत होते. औरंगपुरा येथील बंद पडलेल्या शिवसेना भवनात (दि. २४ मे २०१९ ते १६ नोव्हेंबर २०१९) या कालावधीत चोरट्यांनी हात मारला.चोरी झाल्याचे सोमवारी रात्री उघडकीस आले. त्यात ३५ हजारांचा एलईडी टीव्ही, १५ हजारांचे सॅटेलाईट रिसिव्हर, ३ हजार रुपयांचे यूपीएस, ३ हजार रुपयांचे अॅम्प्लिफायर, ४० हजार रुपयांच्या अॅल्युमिनियम फ्रेम्स, १० हजार रुपये किमतीच्या टेबलाचे ड्रायव्हर्स, हॅन्डल्स, आॅफिस टेबलावरील साहित्य आणि १९९९-२००४, २००९-१४ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचे साहित्य, कार्यालयातील पत्रव्यवहार, हिशोब, प्रचार साहित्याचे नमुने, नामनिर्देश पत्राची सत्यप्रत, निवडणूक निकालाच्या आकडेवारीचे सर्व साहित्य, परवानगी, करारनाम्याच्या बॉक्सफाईल्स असा ऐवज चोरीस गेला. ही चोरी चोरट्यांनी केली की अन्य कोणी आपल्या फायद्यासाठी, असे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जोशी यांच्या तक्रारीवरून क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राऊत करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या