💥पत्रकारांना गुलाम समजण्याचा नेत्यांनी माज करू नये...!



💥आम्ही वर्तमानपत्राचे कर्मचारी आहोत,पत्रकार आहोत, तुमचे गुलाम नाही💥

आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या समन्वय बैठकीची माहिती पत्रकारांना कळू नये यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जो खालच्या पातळीचा हीन प्रकार केला त्याचा ‘नवाकाळ’ कडक शब्दांत निषेध करीत आहे. पत्रकार हे आपले गुलाम आहेत हे समजण्याचा माज नेत्यांनी करू नये. महाराष्ट्रात सरकार स्थापन होत नसल्याने शेतकर्‍यांपासून सर्वच हवालदिल आहेत, अशा स्थितीत सत्ता स्थापनेची प्रत्येक माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकार रात्रंदिवस करीत आहेत. हे काम करताना ऊन असो, पाऊस असो, पोटात सकाळपासून एक कण अन्‍नाचा नाही तरी पत्रकार माहिती मिळविण्यासाठी  धावाधाव करीत आहेत. गेले 21 दिवस जीवाचे रान करीत आहेत आणि आज त्यांना फसविण्यासाठी अजित पवार चेहर्‍यावर संताप आणून बाहेर येत बैठक रद्द झाल्याचे सांगतात. अजित पवार उद्या येतील असे शरद पवार सांगतात. पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात सर्वच बैठक रद्द झाल्याचे सांगतात आणि मग लपून अज्ञातस्थळी जाऊन बैठक घेतात आणि आम्ही पत्रकारांची चेष्टा केली असे सांगतात हा काय प्रकार आहे?
पत्रकारांना फसवून, खोटे बोलत त्यांची चेष्टा करून अज्ञातस्थळी बैठक घ्यायची हे सर्व कशासाठी  केले? तुमच्या एकाही बैठकीवेळी  पत्रकारांना आत प्रवेश नसतो. तुम्ही नेते पंचतारांकित हॉटेलात बसता, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वातानुकूलित सभागृहात बसता, चहा पिता, जेवता तेव्हा पत्रकार उंबरठ्याबाहेर तासन्तास तुमची बैठका संपण्याची वाट पाहत बसतो. भररस्त्यात पत्रकार उभे असतात. त्यांना बसायलाही जागा नसते, डोक्यावर पंखा नसतो, जेवायला गेलो आणि बैठक संपली तर बाईट मिळणार नाही  म्हणून भुकेल्यापोटी हे पत्रकार तिथेच उभे राहतात. हे नेते त्यांना कधी पाणी विचारत नाहीत की चहा देत नाहीत की स्टूल देत नाहीत. बैठकीत खरे काय चालले हे पत्रकारांना कळतही नाही. मग पत्रकारांचे हंसे करून, नाटके करून अज्ञातस्थळी बैठक घेतली कशाला? शेवटी तुम्ही बैठकीतून बाहेर येऊन जे सांगता आणि जितके सांगता तितकेच आम्ही दाखवितो. तरीही आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अभिनय करून, खोटे बोलून पत्रकारांची चेष्टा केली. या नेत्यांच्या दिवसभर बैठका चालतात, पण अंगावरच्या पांढर्‍या झब्ब्याला सुरकुती पडत नाही इतकी सर्व सोय असते आणि या बैठकीतून जे निष्पन्‍न होणार आहे त्याचा मलिदाही या नेत्यांनाच मिळणार आहे. तरीही पत्रकारांवर माज करायचा. त्यांनाच लाथाडायचे. त्यांना फसवायचे. त्यांची चेष्टा करायची हे शोभते का? तुम्ही नेते शेतकर्‍यांच्या बांधावर जाता त्याच्या बातम्या दिल्या गेल्या नाहीत तर तुम्ही शेतकर्‍यांकडे फिरकणारही नाही हे सत्य अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. तेव्हा नेत्यांनो, जरा जपून आणि जितेंद्र आव्हाडजी, चेष्टा कुणाची आणि कधी करायची याचे भान नेत्यांना राखायला सांगा. आम्ही वर्तमानपत्राचे कर्मचारी आहोत,पत्रकार आहोत, तुमचे गुलाम नाही..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या