💥धनंजय मुंडे यांच्या खोट्या क्लिप प्रकरणी भाजपाच्या सोशल मीडिया टीमविरुद्ध गुन्हा दाखल...!💥परळी शहर पोलिसांनी या प्रकरणी भाजप सोशल मीडिया टीम विरुद्ध रितसर गुन्हा दाखल केला💥

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी विधानसभेची निवडणूक अखेर भावनिक मुद्द्यावर येऊन ठेपली आहे, "त्या" कथित व्हायरल क्लिप प्रकरणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या वतीने काल (दि. १९) रात्री उशिरा फिर्याद देण्यात आली होती, त्याप्रकरणी आज अखेर भाजप सोशल मीडिया टीम विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

काल निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात असताना अखेरच्या काही मिनिटात धनंजय मुंडे यांची दि. १७ रोजीच्या प्रचारसभेत बोललेल्या वक्तव्याच्या व्हीडिओ क्लिपला भलताच रंग देऊन भाजपच्या सोशल मीडिया टीम कडून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली. त्यामध्ये धनंजय मुंडे यांनी बोललेल्या मूळ वक्तव्याला संकलित (एडिट) करून प्रसारमाध्यमामध्ये निवडणुकीत उमेदवार असलेल्या धनंजय मुंडे यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने पसरवले असून ही बाब श्री मुंडे यांच्या निवडणुकीवर परिणाम करणारी असल्यामुळे याविरोधात तात्काळ गुन्हा नोंद करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली होती.

परळी शहर पोलिसांनी या प्रकरणी भाजप सोशल मीडिया टीम विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४६९, ३४ व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(क) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान धनंजय मुंडे यांनी याबाबत आज (दि.२०) सकाळी पत्रकार परिषद घेत या विषयाचा खुलासा केला आहे. ती व्हायरल क्लिप मूळ भाषण संकलित करत जाणीवपूर्वक दोन दिवस उशिरा पसरवली आहे; भाजपकडून काही ठराविक लोकांकडून मला राजकारणातून संपवण्याचा हा डाव असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. तर अगोदरच दोन्ही मुंडे परिवारातील संबंध ताणलेले असताना अशा गोष्टी जाणीवपूर्वक पसरवल्या असून आपण या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाणार असल्याचेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. या सर्व घडामोडीनंतर आता प्रशासन भाजप सोशल मीडिया टीम विरुद्ध कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या