💥पीएमसी बँकेनेच उघडली २१ हजार बनावट खाती, अनेक घोटाळे उघड...!💥बँकेच्या ७ राज्यांत मिळून १३७ शाखा असून, खातेधारकांची संख्या लाखांमध्ये आहे💥

रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेतील अनेक घोटाळे आता उघडकीस येत असून, पोलिसांनी या बँकेविरुद्ध जी तक्रार दाखल केली आहे, त्यात दिलेल्या कर्जाची रक्कम लपवण्यासाठी बँकेने तब्बल २१ हजार बनावट खाती उघडली होती, याचा उल्लेख केला आहे.या बँकेवर निर्बंध घालण्यात आल्याने कोणत्याही खातेधारकाला सहा महिन्यांत केवळ १0 हजार रुपयेच काढता येणार आहे. या बँकेच्या ७ राज्यांत मिळून १३७ शाखा असून, खातेधारकांची संख्या लाखांमध्ये आहे. रिझर्व्ह बँकेने घातलेल्या निर्बंधांमुळे बँकेचे खातेधारक आणि ज्यांनी त्यात मोठ्या मुदत ठेवी ठेवल्या आहेत, ते हवालदिल झाले आहेत.मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार पंजाब अँड महाराष्ट्र बँकेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. यामध्ये थकित कर्जांची रक्कम लपवून ठेवल्याचा उल्लेख आहे. तसेच अनियमितपणे ४३५५ कोटी रुपयांचे कर्जवाटप केल्याचे तक्रारी म्हटले आहे. या तक्रारीनुसार केवळ एका बांधकाम व्यावसायिक कंपनीला (एचडीआयएल) आणि त्याच्यासमूह कंपन्यांसाठी एकूण कर्जे देण्यात आल्याची माहिती आहे. बँकेने जी एकूण कर्जे दिली आहेत, त्यापैकी७३ टक्के कर्जे एकट्या एचडीआयएलला मिळाली आहेत.एचडीआयएल कंपनीला बँकेने २५00 कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. ही कंपनी दिवाळखोरीत गेल्याने या रकमेची वसुली कशी होणार, हा प्रश्नच आहे. ही कंपनी दिवाळखोरीत गेल्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार पीएमसी कंपनीला एनपीएमध्ये (थकित कर्जे) टाकणे गरजेचे होते. ते बँकेने केले नाही. तसेच थकित कर्जासंबंधीची माहितीही पीएमसीने रिझर्व्ह बँकेला दिली नाही.

सरव्यवस्थापकांची कबुली -

एचडीआयएल कंपनीला एवढे मोठे कर्ज देताना बँकेच्या काही संचालकांना अंधारात ठेवले आणि चेअरमन, चार संचालक व आपण स्वत: यांनी तो निर्णय घेतल्याचे पीएमसी बँंकेचे सरव्यवस्थापक जॉय थॉमस यांनी निर्बंधांनंतर रिझर्व्ह बँकेला कळविले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या