💥धडाकेबाज आंदोलनकर्ते नितीन नांदगावकर यांचा शिवसेनेत प्रवेश....! 💥महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का,शिवसेना पक्ष प्रमुखांच्या उपस्थितीत बांधले शिवबंधन💥

मनसे प्रमुख राज ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीत आपला प्रभाव दाखवून देण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी करत आहेत. मात्र यादरम्यान शिवसेनेने मनसेला मुंबईत जबरदस्त धक्का दिला आहे. धडाकेबाज आंदोलनांसाठी प्रसिद्ध असलेले मनसेच्या वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांनीशिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत हाती शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला आहे.
मनसे स्टाइल खळ्ळ फटॅक आंदोलनांमुळे नितीन नांदगावकर हे चर्चेत आले होते. तसेच त्यांनी आपल्या आक्रमक शैलीमध्ये अनेकांना न्याय मिळवून दिला होता. हल्लीच त्यांनी टॅक्सी मीटरमध्ये फेरफार करून प्रवाशांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या टॅक्सी चालकांविरोधात मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. नितीन नांदगावकर हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती. अखेरीस रात्री त्यांनी  मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हाती शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश दिला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नितीन नांदगावकर यांनी पक्षाला दिलेली सोडचिठ्ठी हा मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 5 जणांची दुसरी यादी बुधवारी जाहीर केली होती. यामध्ये डोंबिवली मंदार हळबे, धुळे शहर - प्राची कुलकर्णी, नांदेड उत्तर - गंगाधर फुगारे, ऐरोली- निलेश बाणखेले, चांदिवली - सुमित भारस्कर, घाटकोपर पूर्व - सतिश नलावडे, शिवडी - संतोष नलावडे, औसा - शिवकुमार नगराळे, विलेपार्ले - जुईली शेेंडे यांच्यासह अनेकांची नावे आली होती. मात्र मनसेच्या पहिल्या दोन्ही याद्यांमध्ये नितीन नांदगावकर यांच्या नावाचा समावेश नव्हता...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या