💥यवतमाळ जिल्ह्यात निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कलम 144 लागू...!



💥आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास तात्काळ कार्यवाही करण्याच्या सुचना💥

यवतमाळ, दि. 19 : ‍जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदार संघात 21 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदान संपण्याच्या 48 तासांपूर्वी जाहीर प्रचार बंद झाला आहे. तसेच जिल्ह्यात कलम 144 लागू झाले आहे. त्यामुळे या कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याच्या घटना निदर्शनास आल्या तर त्याबाबत तात्काळ कार्यवाही करावी, अशा सुचना निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मतदानाच्या दिवशी (21  ऑक्टोबर 2019) मतदार  केंद्र परिसरात जमाव करण्यास, मतदारांना बळजबळीने मतदान करण्यास किंवा मतदान न करण्यास प्रवृत्त करणे, उमेदवारांच्या निवडणूक चिन्हाचे प्रदर्शन करणे, मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट व इतर इलेक्ट्रानिक उपकरणांचा वापर करून वाहनाचा मतदान केंद्रामध्ये अनधीकृत प्रवेशावर बंदी घालणे, शंभर मिटर परिघाच्या आत मतदान केंद्राच्या परिसरात आणि मतदान मंडपामध्ये भ्रमणध्वनी, तारविरहीत दुरध्वनी आणि बिनतारी संदेश संच इत्यादी बाळगण्यास किंवा वापरण्यास कोणत्याही व्यक्तीला मुभा नाही. केवळ निरिक्षक / सुक्ष्म निरिक्षक, मतदान केंद्राध्यक्ष व सुरक्षा कर्मचारी वर्ग यांनाच भ्रमणध्वनी बाळगण्यास मुभा आहे. मात्र, त्यांनी त्यांचे भ्रमणध्वनी साईलेंट मोडवर ठेवावीत. मतदानाच्या अनुषंगाने घरोघरी जावून प्रचार करण्यास मुभा असणार आहे. परंतु एकाच वेळी पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव कुठेही करता येणार नाही, असे आदेश देण्यात आले आहे.
यासंदर्भात फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 (1)  अन्वये सदर आदेश संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याकरीता 19 ऑक्टोबर च्या सायंकाळी 6 वाजतापासून 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान प्रक्रीया संपेपर्यंत लागू राहील. तथापी हा आदेश मतदानाशी संबंधीत पोलीस अधिकारी, इतर अधिकारी, सुरक्षा पथकातील कर्मचारी, निवडणूक निरिक्षक यांना लागू राहणार नाही. या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 नुसार कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
००००००

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या