💥वयोवृध्द आई-वडिलांना घराबाहेर काढणाऱ्या मुलासह सुनेवर गुन्हा दाखल...!



💥ज्येष्ठ नागरिक व पालक यांचे पालन- पोषण आणि कल्याण अधिनियम कायदा कलमान्वये गुन्हा दाखल💥

वयोवृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करण्याऐवजी त्यांना घराबाहेर काढणारा मुलगा व त्याच्या पत्नी विरोधात लोणी काळभोर (ता. हवेली) पोलिसांत ज्येष्ठ नागरिक व पालक यांचे पालन- पोषण आणि कल्याण अधिनियम कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    याबाबत पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांनी माहिती दिली की, ठकसेन रामभाऊ जवळकर (वय ६७,रा. पानमळा, आळंदी म्हातोबाची, ता. हवेली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, लोणी काळभोर पोलिसांनी त्यांचा मुलगा बापू व त्याची पत्नी सारिका (रा. आळंदी म्हातोबाची) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ठकसेन जवळकर यांना दोन मुलगे असून, ते दोघे आपल्या पत्नी व मुलांसह वेगळे राहातात. ठकसेन यांनी आपली शेतजमीन दोघांना कसण्यासाठी वाटून दिली आहे. ते आपली पत्नी छबूबाई (वय ६५) यांच्यासह मोठा मुलगा बापू व सून सारिका यांच्याबरोबर  राहतात. दोन दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून बापू व त्याच्या पत्नीने ठकसेन व त्यांची पत्नीछबूबाई यांना घराबाहेर काढले. याबाबत गावातील ज्येष्ठ नागरिकांनी बापू व त्यांच्या पत्नीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, बापू व त्याच्या पत्नीने आई-वडिलांना सांभाळण्यास नकार दिला. अखेर ठकसेन जवळकर यांनी लोणी काळभोर पोलिसांत तक्रार दाखल केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या