🌟पाकिस्तानची असुरक्षित अण्वस्त्रे 'आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या देखरेखीखाली घेण्यात यावी...!


🌟भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी🌟

नवी दिल्ली : पाकिस्तानसारख्या बेजबाबदार देशाच्या हातात अण्वस्त्रे सुरक्षित आहेत का असा सवाल करीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी, पाकिस्तानची अण्वस्त्रे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (आयएईए) देखरेखीखाली घेतली पाहिजेत, अशी मागणी गुरुवारी केली.

'ऑपरेशन सिंदूर' आणि शस्त्रविराम झाल्यानंतर राजनाथ सिंह यांनी जम्मू आणि काश्मीरमधील बदामी बाग छावणीला भेट दिली. यावेळी त्यांनी सैन्यातील जवानांशी संवाद साधला. 'ऑपरेशन सिंदूर' द्वारे भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले असल्याचे ते म्हणाले. तसेच पाकिस्तानकडून दिल्या जाणाऱ्या अणुबॉम्बच्या धमक्यांचा उल्लेख करत त्यांनी पाकिस्तानची अण्वस्त्रे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या देखरेखीखाली असावीत असे म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मंगळवारी अशाच प्रकारची घोषणा केली होती. भारतीय लष्कराने अणुबॉम्बच्या धमक्यांना न जुमानता चोख प्रत्युत्तर दिले. तेव्हा आपल्या शत्रूलाही 'भारत माता की जय'चा अर्थ कळला, असे मोदी म्हणाले होते.

💫संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांचा दौरा :-

भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रविराम झाल्यानंतर पाच दिवसांनी राजनाथ सिंह यांनी गुरुवारी श्रीनगरचा दौरा केला. श्रीनगर विमानतळावर लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी त्यांचे स्वागत केले. राजनाथ सिंह यावेळी म्हणाले, 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पाकिस्तानात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना हा संदेश दिला गेला की, ते कुठेही लपले तरी सुरक्षित राहणार नाहीत. आता ते आमच्या सैन्याच्या निशाण्यावर आहेत. जगाला हे माहीत आहे की, आमच्या सेनेचा निशाणा अचूक आहे. ते जेव्हा जेव्हा लक्ष्य भेदतात, तेव्हा मृतदेह मोजण्याचे काम शत्रूवर सोडतात.

दहशतवादाविरोधात भारताने ठोस अशी पावले उचलल्याचे सर्वांनी पाहिले. पाकिस्तानच्या अणुबॉम्बच्या धमक्यांनाही आपण भीक घातली नाही. संपूर्ण जगाने पाहिले की, पाकिस्तानने बेजबाबदारपणे भारताला अणुबॉम्बच्या धमक्या दिल्या. आज श्रीनगरच्या भूमीतून जगाला प्रश्न विचारत आहे की, पाकिस्तानसारख्या बेजबाबदार देशाच्या हातात अण्वस्त्र सुरक्षित आहेत का, पाकिस्तानची अण्वस्त्रे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या देखरेखीखाली घेतली पाहिजेत, अशी मागणी या निमित्ताने मी जगासमोर करत आहे, असे संरक्षणमंत्री म्हणाले.

💫भारतीय जनतेचा संदेश :-

आपल्या लष्कराने पाकिस्तानला जो धडा शिकवला तो ते विसरतील असे वाटत नाही भारतीय सेनेने उत्साह आणि संयम यांचे अतुलनीय संतुलन दाखवत शत्रूच्या तळांना उद्ध्वस्त केले. मी येथे संरक्षण मंत्री तसेच देशाचा संदेशवाहक या नात्यानेही आलो आहे. पूर्ण देशाच्या शुभेच्छा, त्यांच्या प्रार्थना आणि जनतेची कृतज्ञता तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी येथे आलो आहे असेही संरक्षण मंत्री म्हणाले. आम्हाला आमच्या सेनेवर गर्व आहे, असा संदेश देशातील जनतेने दिला आहे, तो घेऊन मी तुमच्यासमोर आज इथे आलो आहे, असेही त्यांनी सांगितले..

💫भारता विरोधात पाकिस्तानला सहकार्य करणाऱ्या तुर्कीयेच्या 'सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस'चा परवाना रद्द :-

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षात पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीयेला भारताने गुरुवारी आणखी एक दणका दिला. राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी 'ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी' ने तुर्कीयेच्या 'सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस'चा परवाना तत्काळ रद्द केला आहे. तुर्कीयेने पाकिस्तानला लष्करी मदत दिल्याच्या, विशेषतः ड्रोन पुरवल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या