🌟परभणी संचलित कृषि विज्ञान केंद्रातर्फे कांदा पिकाच्या प्रक्षेत्र दिनाचे आयोजन.....!


🌟सदरील कार्यक्रमास कृषि विज्ञान केंद्राचे अधिकारी व कर्मचारी तसेच गावातील शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते🌟

भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली पुरस्कृत व जीवन ज्योत चॅरिटेबल ट्रस्ट, परभणी संचलीत कृषि विज्ञान केंद्र,परभणी यांच्या मार्फत मौजे. कसर ता. जिंतुर जि. परभणी येथे दिनांक 30 एप्रिल, 2025 रोजी कांदा या पिकाच्या भिमा शक्ती या वाणाच्या घेण्यात आलेल्या प्रात्यक्षिकाच्या प्रक्षेत्र दिनाचे आयोजन डॉ. प्रशांत भोसले, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. 

कृषि विज्ञान केंद्र, परभणी मार्फत तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार करण्याच्या दृष्टीने कांदा पिकातील साठवणुक क्षमता व उत्पादन वाढ होण्यासाठी भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत कार्यरत असणाऱ्या राजगुरुनगर, पुणे येथील कांदा व लसुण संशोधन संचालनालया मार्फत विकसीत केलेल्या भिमा शक्ती या सुधारीत वाणाचे आद्यरेषा पिक प्रात्यक्षिक शेतकऱ्यांच्या शेतावर घेण्यात आले. 

या आद्यरेषा पिक प्रात्यक्षिकामध्ये वापरण्यात आलेल्या भिमा शक्ती या वाणाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. भिमा शक्ती हा वाण रब्बी व रांगड्या हंगामासाठी विकसीत केला असुन त्याची उत्पादन क्षमता 40 ते 45 टन प्रति हेक्टर एवढी आहे. हा वाण रोग व किडीस प्रतिकारक असुन सामान्य तापमानामध्ये यांची साठवणुक क्षमता 5 ते 6 महिन्या पर्यंत आहे.  

या प्रक्षेत्र दिनाच्या कार्यक्रमामध्ये या वाणाचे प्रात्यक्षिक घेतलेल्या शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना या वाणामुळे शेतकऱ्यांचा उत्पादनात 10 ते 15 टक्के वाढ होईल असे प्रतिपादन केले. या वाणाची साठवणुक क्षमता चांगली असल्यामुळे बाजारामध्ये चांगला बाजारभाव आल्यानंतरच हा वाण विक्रीसाठी नेता येईल व शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल असे प्रतिपादन येथील प्रगतशील शेतकरी श्री. श्रीकांत मगर यांनी केले. तसेच या वाणामध्ये नळग्याचे प्रमाण नगण्य असुन एकरी 150 क्विंटल उत्पादन येईल अशी अपेक्षा प्रगतशील शेतकरी श्री. राजेश मगर यांनी व्यक्त केली.  

कार्यक्रमाच्या तांत्रिक सत्रामध्ये कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ श्री. अमित तुपे यांनी या पिकाचे लागवड तंत्रज्ञान व नवीन विकसीत झालेल्या वाणांची माहिती दिली. शेतकऱ्यांनी भारतीय कृषि संशोधन परिषद अंतर्गत कार्यरत असणाऱ्या संशोधन संस्थांनी विकसीत केलेल्या सुधारीत वाणांचाच वापर करावा तसेच पुढील हंगामामधे यापेक्षाही अधिक उत्पादन घ्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली सदरील कार्यक्रमास कृषि विज्ञान केंद्राचे अधिकारी व कर्मचारी तसेच गावातील शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या