🌟सुदैवाने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या सहित सर्व जण बाल बाल बचावले🌟
✍️ मोहन चौकेकर
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वाहनाला रविवारी, १८ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. बेधुंध ट्रक चालकाने वाशी तालुक्यातील पारगाव टोलनाक्यावर तुपकर यांच्या इनोव्हा कार ला मागून धडक दिली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून रविकांत तुपकर यांच्यासह सर्वजण सुखरूप बचावले आहे. दुर्घटनेत दोघांना किरकोळ मार लागला आहे.
लातूर येथून जालन्याकडे जात असताना रविवारी मध्यरात्री साडेबारा ते एक दरम्यान हा अपघात झाला. शेतकरी नेते रविकांत तुपकर हे जनतेने लोकवर्गणीतून दिलेल्या लोकरथ नाव असलेल्या इनोव्हाने(क्रमांक एम एच २८ बि क्यू ९९९९) जालन्या कडे जात होते. ते वाशी जवळील पारगाव टोल नाक्यावर थांबले होते. दरम्यान मागून भरधाव वेगात आलेल्या ( एम एच ४४ यु १४४४ ) या नंबरच्या ट्रक चालकाने जोरदार धडक दिली. ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत होता. रविकांत तुपकर सहित गाडीतील मागील सीटवर बसलेले सर्व जण अक्षरशः समोर फेकले गेले.
या अपघातात सुदैवाने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना कोणतीही दुखापत झाली नसून ते पूर्णतः सुरक्षित आहेत. मात्र गाडीत त्यांच्यासोबत असलेले स्वीय सहायक पीए कार्तिक सवडतकर व राजाराम जाधव यांना सौम्य मार लागला आहे. चालक अजय मालगे व सहकारी गजानन नाईकवाडे यांना कोणतीही दुखापत नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. चालकासह ट्रकमधील क्लिनरला पोलिसांनी ताब्यात घेतले असून ट्रकही जप्त करण्यात आला आहे.
हा अपघात होता की घातपाताचा प्रयत्न, याबाबत अनेक शंका उपस्थित होत असून पोलिसांकडून दोन्ही बाजूंनी तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संग्राम थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
शेतकरी नेते रविकांत तुपकर हे राज्यात कर्जमुक्तीच्या प्रश्नावर दौऱ्यावर आहेत. नुकतेच त्यांनी नाशिक, परभणी, बीड येथील दौरे पूर्ण केले असून आज अंबाजोगाई तालुक्यातील देवळा येथे ‘कर्जमुक्ती एल्गार सभेला संबोधित केले. सभा आटोपून त्यांनी लातूर जिल्ह्यातील तांदुळजा येथे कार्यकर्त्यांसोबत स्नेहभोजन घेतले व त्यानंतर रात्री १२: ३० ते १ वाजेच्या दरम्यान जालन्याकडे जात असताना वाशीजवळ टोल नाक्यावर पारगाव टोल नाक्यावर हा अपघात घडला.
या अपघातामुळे क्रांतीकारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्यातील संपूर्ण कार्यकर्त्यांमध्ये व रविकांत तुपकर यांच्या संपुर्ण महाराष्ट्रात असलेल्या हितचिंतकामध्ये खळबळ उडाली होती . मात्र शेतकरी नेते रविकांत तुपकर हे सुखरूप असल्याचे समजताच सर्व कार्यकर्त्यांनी व हितचिंतकांनी सुटकेचा निश्वास घेतला. या अपघाताचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस यंत्रणांकडून व प्रशासनाकडून शासनाने सखोल व सर्व बाजुनी चौकशी करावी अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे. ट्रक चालक संभाजी डोंगरे (पंढरपूर )याचेवर वाशी पोलीस स्टेशन ला कलम २८१,कलम १८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वाशी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संग्राम थोरात पुढील तपास करत आहेत.......
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या