🌟हिंगोली जिल्ह्यातील कोपरवाडी येथे भरधाव टिप्परच्या धडकेत दोन भावांचा मृत्यू तर चौघेजण गंभीर जखमी....!


🌟अपघातातील जखमींना उपचारासाठी आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे🌟

 ✍️ शिवशंकर निरगुडे (हिंगोली)

हिंगोली :- हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील कोपरवाडी शिवारात भरधाव टिप्परने धडक दिल्याने झालेल्या अपघातात कुपटी येथील दोन सख्या भावांचा मृत्यू झाला तर चौघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना काल रविवार दि.१८ मे २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास घडली.

या अपघातातील जखमींना उपचारासाठी आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पोलिसांनी टिप्पर व चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. वसमत तालुक्यातील कुपटी येथील मुळचे रहिवासी असलेले संतोष माहोरे हे मागील काही वर्षापासून पुणे येथे राहतात. त्या ठिकाणी खासगी कंपनीमध्ये ते काम करतात. हिंगोली येथे नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यासाठी माहोरे कुटुंबिय हिंगोलीत आले होते. त्यानंतर त्यांची मुले अरुण संतोष माहोरे (वय 18), अनिकेत संतोष माहोरे (17) हे त्यांचा मित्र अनिकेत मुळे यांच्यासह कोपरवाडी येथे आजी आजोबांना भेटण्यासाठी गेले होते.

दरम्यान, रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ते गावाजवळ थांबले असतांना रामेश्वरतांडा येथून तलावातील काळीमाती घेऊन कोपडवाडीकडे निघालेला टिप्पर कोपरवाडी येथील आबादानी येथे आला असतांना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. या टिप्परने रस्त्याच्या बाजूला असलेल्या सहा जणांना धडक मारली. या अपघातात सर्व सहाजण जखमी झाले.

यामध्ये अनिकेत माहोरे (17), गजानन मुकाडे (18), संदीप मारकड (21), अरुण माहोरे (18), वैभव डुकरे (18), अनिकेत मुळे (18), यांचा समावेश आहे. या अपघाताची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठे, उपनिरीक्षक गणेश घोटके, जमादार सुनील रिठ्ठे, पिराजी बेले, राजीव जाधव, विजय जाधव, शिवाजी पवार यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

मात्र अनिकेत माहोरे व अरुण माहोरे या दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले. मात्र नांदेड येथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. या घटनेमुळे माहोरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. मृत माहोरे बंधूंच्या पश्चात आई, वडिल, एक भाऊ असा परिवार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. दरम्यान, आखाडा बाळापूर पोलिसांनी टिप्पर जप्त केला असून चालकालाही ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरु केली आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या