🌟परभणी शहरात दिवंगत लोकनेते विजय वाकोडे यांचे स्मारक होणार....!


🌟अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभा सदस्य खासदार चंद्रकांत हांडोरे यांनी दिली🌟


परभणी :
मराठवाड्यातील आंबेडकरी चळवळीतील अग्रगण्य दिवंगत लोकनेते विजय वाकोडे यांचे परभणी शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने स्मारक उभारले जाईल अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभा सदस्य खासदार चंद्रकांत हांडोरे यांनी दिली.

         काँग्रेस पक्षाच्यावतीने परभणी जिल्ह्यात काढण्यात आलेल्या दोन दिवसीय सद्भावना पदयात्रा आणि संविधान बचाव रॅलीनिमित्त अक्षदा मंगल कार्यालयाच्या सभागृहात काल सोमवार दि.०५ मे २०२५ रोजी दुपारी आयोजित केलेल्या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

         भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील संविधान उद्देशिकेच्या प्रतिकृतीची विटंबन प्रकरणी शांतता मोर्चा काढण्यात आला होता. त्या आंदोलना दरम्यान पोलीस कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा पोलिसांनी नाहक बळी घेतला. तसेच या आंदोलनादरम्यान आंबेडकरी नेते विजय वाकोडे यांचेही निधन झाले, असे नमूद करतेवेळी आंबेडकरी चळवळीतील अग्रगण्य असणारे वाकोडे यांचे परभणीत उचित स्मारक व्हावे, अशी सर्वसामान्य नागरीकांची तीव्र भावना आहे. त्या गोष्टीची निश्‍चितच दखल घेतली जाईल व  विजय वाकोडे यांच्या निवासस्थानासमोरील परिसरात काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांचे स्मारक उभारले जाईल. स्मारकासाठी लागणारा सर्व निधी माझ्या खासदार निधीतून देणार असल्याचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी यावेळी जाहीर केले.

          भाजपाला संविधान बदलून मनुवाद आणायचा आहे, अशी टीका करतेवेळी भाजप सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. सर्वसामान्यांचे लक्ष दुसरीकडे वळविण्याकरीता सर्वार्थाने प्रयत्न सुरु आहेत. हे प्रयत्न नागरीकांनी ओळखले पाहिजे व भाजपाचा खरा चेहरा उघडकीस आणला पाहिजे, असे ते म्हणाले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या