🌟देऊळ केले कुलूपबंद : मातंग समाजाच्या नवरदेवाची थेट महापुरुषांच्या पुतळ्यापुढे मिरवणूक...!


🌟नवरदेवाने महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराजांना केले अभिवादन🌟

 ✍️ मोहन चौकेकर 

(माळखेड गावातील मंदिरबंदीला खंबीर उत्तर – सडलेल्या मानसिकतेचा क्रांतिकारी विरोध,नवविवाहितांचा ऐतिहासिक निर्णय समाजासाठी ठरतोय प्रेरणादायी)

मेहकर  : – हिंदू धर्माचा आणि देवभक्तीचा अभिमान बाळगणाऱ्या समाजात आजही काही ठिकाणी जातीयतेच्या विळख्यातून लोक बाहेर पडायला तयार नाहीत. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील माळखेड या गावात अशीच एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

  मातंग समाजातील एका नवरदेवाला गावातील मारुती मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला. मंदिराला कुलूप लावून सडलेली मानसिकता प्रदर्शित करणाऱ्या काही मनुवादी आणि जातीयतेच्या भिंती अजूनही कोसळलेल्या नाहीत, हे या घटनेतून स्पष्ट झाले. त्यांच्या मते, मागास समाजातील व्यक्तींनी मंदिरात प्रवेश केल्यास देव 'बाटेल'. हा विचार केवळ अपमानास्पदच नाही, तर भारतीय संविधानाच्या मुल्यांनाही चपराक मारणारा आहे.

 या अन्यायकारक वागणुकीच्या विरोधात युवा पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते छोटू कांबळे यांनी घेतलेला क्रांतिकारी निर्णय चर्चेचा विषय ठरतो आहे. त्यांनी नवरदेवाची मिरवणूक थेट छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत नेली आणि तिथे अभिवादन करून विवाहसोहळ्याला सुरुवात केली.

 हलगीच्या गजरात, डोक्यावर फेटा आणि आत्मसन्मानाचा अभिमान घेऊन नवरदेवाने देवळाच्या दारातून नव्हे, तर महापुरुषांच्या विचारातून विवाहाला सुरुवात केली. ही घटना फक्त एका गावात घडलेली नसून, ती संपूर्ण महाराष्ट्रातील जातीभेदाने ग्रासलेल्या लोकांसाठी एक चेतावणी आणि जागृती घेऊन आली आहे.

   सडलेल्या मानसिकतेचा हा विरोध म्हणजे एक नवा सामाजिक पुरोगामी दृष्टिकोन आहे. समाजात सन्मान, समानता आणि न्याय यांच्यासाठी लढणाऱ्या प्रत्येकासाठी ही घटना एक प्रेरणा ठरेल. अशा घटना उघड करण्याची, त्यांचा प्रतिकार करण्याची आणि समाजात नवचैतन्य निर्माण करण्याची आज गरज आहे. "मंदिरं कुलूपबंद करा, पण मनं उघडा... आता देव महापुरुषांच्या विचारांत आहे!"

असा संदेश माळखेडच्या मातीतून झेपावतो आहे.

"माळखेडच्या घटनेने दाखवून दिले की मंदिरं बंद होऊ शकतात, पण समतेच्या विचारांचा प्रवाह कधीही थांबत नाही. नवविवाहितांनी महापुरुषांच्या विचारांपुढे नतमस्तक होऊन आत्मसन्मान आणि सामाजिक न्यायाचा एक नवा आदर्श घालून दिला आहे. जातीयतेच्या सडलेल्या मानसिकतेला हा ठाम विरोध आहे, जो संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरेल. आजचा हा क्रांतिकारी लढा केवळ माळखेडपुरता मर्यादित नाही ; तो संपूर्ण देशाला समानतेचा संदेश देणारा आहे. समाजाला भेदभावाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी प्रत्येकाने विचारमूर्तींचा मार्ग स्वीकारून ठाम उभं राहायला हवं. ही घटना समाजजागृतीचं प्रतीक आहे."

- भाई छोटू कांबळे पत्रकार तथा डीपीआय राज्य प्रवक्ते 

  ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या