🌟सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भुषण गवई यांनी व्यक्त केली खंत🌟
मुंबई : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई हे काल रविवार दि.१८ मे २०२५ रोजी सरन्यायाधीश झाल्यानंतर ते प्रथमच मुंबईत आले राजशिष्टाचारानुसार त्यांचे स्वागत करण्यासाठी पोलीस व प्रशासनातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते मात्र तसे न झाल्याने 'महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकारी राजशिष्टाचाराचे पालन करत नाही' अशी खंत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली.
'राजशिष्टाचाराचे पालन राज्यातील अधिकारी करत नाहीत याबद्दल मी निराश झालो आहे. जर भारताचा सरन्यायाधीश प्रथमच महाराष्ट्रात येत असेल, तर राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त हे उपस्थित असणे अपेक्षित आहे. त्यांची अनुपस्थिती विचार करायला लावते', अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
सरन्यायाधीश गवई रविवारी मुंबईत आले होते. 'महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिल' ने त्यांच्या सन्मानार्थ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र, त्यांचे स्वागत करण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक किंवा मुंबईचे पोलीस आयुक्त हजर नव्हते. प्रोटोकॉलचा भंग झाल्याने सरन्यायाधीश गवई यांनी आपल्या भाषणात नाराजी व्यक्त केली.
सरन्यायाधीश गवई म्हणाले की, न्यायपालिका, विधिमंडळ आणि कार्यपालिका हे लोकशाहीचे तीन प्रमुख स्तंभ आहेत. या सर्वांनी एकमेकांचा सन्मान करणे आवश्यक आहे.भाषणाच्या दरम्यान गवई हे भावनाविवश झाले. त्यांनी म्हटले, "मी सर्वांचा खूप आभारी आहे. मला जे प्रेम आणि सन्मान मिळाला आहे, त्याने मी भारावून गेलो आहे. गेली ४० वर्षे मला हा स्नेह मिळत आहे. आजचा कार्यक्रम माझ्यासाठी अविस्मरणीय आहे, असे त्यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांची नंतर धावाधाव
भूषण गवई यांनी आपल्या भाषणात खंत व्यक्त केल्यानंतर लगेच महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी चैत्यभूमीच्या दिशेला धाव घेतली. कारण तोपर्यंत 'बार कौन्सिल'चा कार्यक्रम आटोपला होता. सरन्यायाधीश भूषण गवई भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल झाले होते. यावेळी महाराष्ट्राचे तीनही वरिष्ठ अधिकारी चैत्यभूमीवर दाखल झाले.......
0 टिप्पण्या