🌟परभणी शहरातील गव्हाणे रोडचे रुंदीकरणाचे काम राहिले कोसो दूर : रस्त्याच्या मध्यभागी असलेले धोकादायक पोलही हटेनात...!


🌟परभणी महानगर पालिकेचा बेजबाबदार कारभार : शहरातील नागरीक झाले हतबल : दररोज घडताय अपघात🌟

परभणी : परभणी महानगर पालिका प्रशासनासह आयुक्तांचा बेजबाबदार कारभार शहरातील नागरिकांसाठी अक्षरशः डोकेदुखी ठरत असून कोट्यवधी रुपयांची रस्ते नाल्यांची काम अर्धवट सोडण्यात आल्याने या अर्धवट कामांचा फटका नागरिकांना बसत आहे शहरातील गुलशनाबाग परिसरातील सिमेंट नालीचे अर्धवट बांधकाम महानगर पालिका प्रशासनाचा बेजबाबदार कारभार उजागर करीत असतांनाच शहरातील मध्यवस्तीतील गव्हाणे रोडच्या रुंदीकरणासह मजबुतीकरणाचे काम देखील अर्धवट झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे महानगरपालिका प्रशासनाने या रस्त्यावरील मध्यभागातीलच धोकादायक असे विद्युत पोलसुध्दा अद्यापपर्यंत हटविले नाहीत. त्याचा परिणाम हे पोल दररोज छोट्या छोट्या अपघातास निमंत्रण देणारे ठरले आहेत.

           काही वर्षांपूर्वी या रस्त्याच्या रुंदीकरणासह मजबुतीकरणाकरीता तत्कालीन नगरपालिकेने पाऊले उचलली. विशेषतः या रस्त्याच्या मधोमध दुभाजक टाकून एकेरी वाहतूकीचा मार्ग मोकळा करण्याचाही संकल्प सोडण्यात आला. त्या दृष्टीने या रस्त्यावर नारायण चाळ कॉर्नर पासून हॉटेल निरज कॉर्नर, तेथून पुढे गव्हाणे चौक व तेथून पुढे नवा मोंढा पर्यंत ठिकठिकाणी छोटछोटे दुभाजक उभारले गेले. त्या दुभाजकात पालिका प्रशासनाने मोठे पोल उभारुन पथदिवे कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. त्या प्रमाणे पोलसुध्दा उभारले गेले. परंतु, पोलवर नगरपालिका प्रशासनाने दिवे काही बसविलेच नाहीत. आज ना उद्या या पोलवरील दिवे उजळतील व रस्त्याही उजळेल, असे अपेक्षित होते. परंतु, माशी कोठे शिंकली कळले नाही. पोलवर दिवेही बसले नाहीत, रस्ते उजळण्याचा तर प्रश्‍नच शिल्लक राहीला नाही. अलिकडे हे पोलच आता धोकादायक ठरले आहेत. कारण गव्हाणे रोड हा आधीच अरुंद रस्ता, त्या रस्त्यावर पहाटेपासून रात्री उशीरापर्यंत प्रचंड अशी वर्दळ, व्यापारी पेठेमुळे हा रस्ता सतत वाहतूकीसाठी व्यस्त असणारा, त्यामुळेच या रस्त्यावर रात्री बेरात्री मधोमधचे हे पोल दररोज अपघातासाठी निमंत्रण देणारे ठरु लागले आहेत. या रस्त्यावरील अर्धेअधिक पोल वाहनांच्या धडकेमुळे आडवे तिडवे झाले आहेत. काही पोल यापूर्वीच मुळापासून उखडल्या गेले आहेत. काही पोल सन्मानाने उभे आहेत, दुर्देवाने ते पोल केबल चालकांच्या केबलच्या वापराकरीताच उभारले गेले की काय? अशी शंका येवू लागली आहे. विनावापराचे हे पोल तेथून हटवावेत व रस्ता सुरळीत वाहतूकीकरीता खुला करावा, अशी मागणी या भागातील नागरीकांनी वारंवार केली. परंतु, पालिका प्रशासनाने आजपर्यंत त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे पोल हटविण्याचा प्रश्‍नच उद्भवला नाही. छोट-छोटे हे विषयसुध्दा महापालिकेच्या दृष्टीने दुर्लक्षित होत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या