🌟परभणी जिल्ह्यात खरीप हंगामासाठी मुबलक प्रमाणात बियाणे उपलब्ध : बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी....!


🌟परभणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना केले आवाहन🌟 

•🔴 अधिकृत विक्रेत्यांकडून बियाणे खरेदी करा

•🔴 बियाणे खरेदीची पावती अवश्य घ्या

•🔴 अनोळखी व्यक्ती / दलालापासून सावध रहा

•🔴 तक्रार असल्यास कृषी कार्यालयाशी संपर्क साधा

परभणी : परभणी जिल्ह्यात खरीप हंगामासाठी मुबलक प्रमाणात बियाणे उपलब्ध आहेत.  तरी बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी.  बियाणे खरेदी करताना भेसळयुक्त बियाणे खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेते यांच्याकडून पावतीसह बियाणे खरेदी करा. अनोळखी व्यक्ती / दलाल यांच्यापासून सावध रहा, असे आवाहन परभणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी केले आहे. 

परभणी जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2025-26 साठी 5,56,952 हे. क्षेत्रावर पिक पेरणीचे नियोजन करण्यात आलेले आहे. मुख्यत्त्वे सोयाबीन व कापूस पिकाचे प्रमुख क्षेत्र आहे. त्यामध्ये सोयाबीन पिकाखाली 2,66,860 हे. साठी 2,00,145 क्विंटल बियाण्यांची गरज आहे. तसेच कापूस पिकाखाली 2,07,885 हे. क्षेत्रासाठी 11,43,368 पाकीटांची गरज आहे. परभणी जिल्ह्यामध्ये बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.

तरी बियाणे खरेदी करताना भेसळयुक्त बियाणे खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेते यांचेकडून पावतीसह बियाणे खरेदी करावे. पावतीवर बियाण्यांचा संपूर्ण तपशील जसे की, पिक, वाण, दर्जा, लॉट नंबर, कंपनीचे नाव, किंमत, खरेदीदाराचे संपूर्ण नाव व पत्ता, विक्रेते त्यांचे नाव इत्यादी नमूद असावे. बियाण्याची पिशवी, टॅग, खरेदी पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. भेसळीची शंका दूर करण्यासाठी पाकीट सीलबंद/ मोहोर बंद असल्याची खात्री करावी. कापूस बियाण्याच्या अनुषंगाने एच.टी.बी.टी.ची खरेदी कोणत्याही अनोळखी व्यक्ती / दलाल/कृषी केंद चालक यांच्याकडून केली जाणार नाही याची काळजी घेण्यात यावी, तसेच कापूस बियाण्याची कोणत्याही विशिष्ट वाणाची मागणी न करता बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या सरस वाणामधून बियाणे निवडून त्याची लागवड करावी.

शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठा रास्त भावात योग्य वेळी योग्य किंमतीत मागणीप्रमाणे मिळण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावर एक व तालुका स्तरावर 9 असे  एकूण 10 भरारी पथके स्थापन करण्यात आलेली आहेत. तरी निविष्ठा खरेदीच्या अनुषंगाने काही तक्रार / अडचण असल्यास आपल्या तालुक्यातील कृषि अधिकारी, पंचायत समिती व संबंधीत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे..... 

*-*-*-*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या